आगडी येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद; महिलांचा पाण्यासाठी मोठा संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 12:50 IST2024-10-10T12:49:35+5:302024-10-10T12:50:25+5:30
Chandrapur : सणासुदीत पाण्यासाठी महिलांचा आक्रोश

Water supply stopped in Agadi for four days; Big struggle of women for water
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील आगडी येथे मागील चार दिवसांपासून २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र नियमित पाणीपुरवठा करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांकडून संताप व्यक्त केल्या जात आहे.
कुटुंबाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षापूर्वी २४ ग्रीड पाणीपुरवठा योजना अमलात आणली. जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन मिशन योजनेची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करीत प्रत्येक कुटुंबाला नळाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र त्या नळाद्वारे कुटुंबाला नियमित पाणीपुरवठा होतो की नाही, याकडे प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष होत आहे. पाणीपुरवठा योजना शोभेची वास्तू ठरली असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी अपयशी ठरत आहे. गावात दोन विहिरी आहेत. मात्र विहिरीचे पाणी गढूळ असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने सदर विहिरीचे पाणी पिण्यास बंदी घातली आहे.
त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. मागील तीन दिवसांपासून २४ ग्रीड पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा या विरोधात गावकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.
शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात
नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चुन २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. मात्र दोन वर्षातच योजनेला घरघर लागली असून सदर योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्यास यंत्रणा असमर्थ ठरत आहे. त्यामुळे योजनेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले.
"मागील चार दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित प्रशासनाने तत्काळ नियमित पाणीपुरवठा सुरु करावा."
- शालिनी दामोधर लेनगुरे, गृहिणी आगडी
"२४ गाव ग्रीड योजनेंतर्गत मौजा जानाळा व आगडी येथे पाणीपुरवठा योजना दोन वर्षापूर्वी अमलात आणली. मात्र गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यास सदर योजना अल्पावधीत कुचकामी ठरली असून मागील चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेला सूचना करूनही दुर्लक्ष करीत आहे."
- दर्शना किन्नाके, सरपंच ग्रामपंचायत जानाळा