गणेश विसर्जनादरम्यान तिघेजण गोसेखुर्द नहरात बुडाले
By परिमल डोहणे | Updated: October 1, 2023 10:09 IST2023-10-01T10:08:02+5:302023-10-01T10:09:33+5:30
दोन सख्या भावांचा समावेश : एकाचा मृतदेह सापडला

गणेश विसर्जनादरम्यान तिघेजण गोसेखुर्द नहरात बुडाले
चंद्रपूर : गणेश विसर्जनासाठी गोसीखुर्द नहरात उतरलेले तिघेजण नवराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सावली येथे शनिवारी मध्यरात्री घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह आढळून आला असून दोघांची शोध मोहीम सुरू आहे.
सचिन उर्फ गुरु दिवाकर मोहुर्ले 33, किराणा व्यवसायिक, निकेश हरिभाऊ गुंडावार 31 रा चांदली 31, संदीप हरीभाऊ गुंडावार (27) रा चांदली असे नहारात बुडालेल्या युवकांचे नाव आहेत. यापैकी सचिन मोहुर्ले याचा मृतदेह कालच रात्रीच जवळच आढळून आला. तर दोघांचा तपास सुरू आहे
जय बजरंग गणेश मंडळातर्फे स्थापन केलेल्या गणेशाची विसर्जन मिरवणूक शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात निघाली. सायंकाळी गणेशाचे विसर्जन करण्यासाठी पाच युवक गोसे खुर्द नहराच्या पाण्यात उतरले. मात्र त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. याबाबतची माहिती होतात सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले. परंतु कोणीही हाती लागले नाही त्यानंतर सावली पोलिसांच्या पथकांनी पाणबुड्यांच्या साह्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी सचिन मोहरले याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. इतर दोघांचा शोध सावली पोलिसांच्या पथकाकडून सुरू आहे.
गुंडवार बंधू व्यवसायासाठी सावलीत
गुंडावार बंधू हे मूळचे मुल तालुक्यातील चांदली येथील रहिवासी आहेत. या दोघांनी सावली येथे येऊन रसवंतीचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायचांगला जम बसत असतानाच अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे