चंद्रपूरात नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:23 IST2026-01-04T15:22:04+5:302026-01-04T15:23:04+5:30
युतीच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अन्याय झाल्याचे केले स्पष्ट

चंद्रपूरात नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस
चंद्रपूर : चंद्रपूरातील भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीत. एखाद्या मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात, मात्र मनभेद नाहीत. सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र आहेत, असा ठाम संदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय संकल्प यात्रेनंतर माध्यमांशी संवाद साधताना रविवारी (दि. ४ जानेवारी) त्यांनी चंद्रपूरातील राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चंद्रपूरात सुधीर मुनगंटीवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, तर किशोर जोरगेवार हे आमदार आहेत. या ठिकाणी कुठेही वाद नाही. आज चंद्रपूरात जो विकास दिसतो आहे, त्यामध्ये मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि जोरगेवार यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या तसेच भाजपशिवाय दुसऱ्या कुणी या शहरात विकास केल्याचे दाखवू शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत चंद्रपूरला प्रचंड मोठा विजय मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक प्रचाराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कमी दिवसांत जास्तीत जास्त प्रचार करायचा आहे. सगळीकडे पोहोचण्याचे आव्हान आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांतून थ्री-सिक्स्टी डिग्री प्रचार केला जात आहे.
मुनगंटीवार यांना मंत्रीपद दिले नाही, यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, युतीच्या राजकारणात २० जागा बाहेर द्याव्या लागल्या. त्यामुळे काही नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. मात्र युतीचे राजकारण करताना कुणाला ना कुणाला त्याग करावाच लागतो. तरीही चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रावर आमचे पूर्ण लक्ष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पराभव स्पष्ट दिसत असल्याचे मनसे कारणे शोधताहेत
दरम्यान, ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर मनसे न्यायालयात जाणार असल्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला. “मनसेने खुशाल कोर्टात जावे. आम्हाला जनतेच्या कोर्टाने निवडून दिले आहे. जनतेच्या कोर्टाचा फैसला कायम राहील,” असे ते म्हणाले. अविरोध निवडून आलेल्यांमध्ये भाजपसोबतच अपक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवारही आहेत. मात्र त्यावर बोलले जात नाही. पराभव स्पष्ट दिसत असल्याने कारणे शोधली जात आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.