चौघांचा बळी घेणारा 'तो' वाघ अखेर जेरबंद; चंद्रपूर वनविभागाचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 13:50 IST2022-11-10T13:49:57+5:302022-11-10T13:50:29+5:30
सदर, वाघ दोन ते अडीच वर्षांचा असल्याचे समजते

चौघांचा बळी घेणारा 'तो' वाघ अखेर जेरबंद; चंद्रपूर वनविभागाचे यश
ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत उत्तर वनपरिक्षेत्रात मागील पाच महिन्यांत चौघांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
२८ जून २२, १६ ऑगस्ट २२, १७ ऑगस्ट २२, ४ नोव्हेंबर २२ या तारखांना उत्तर वनपरिक्षेत्रात झालेल्या मनुष्य हानीमध्ये स्याम २ वाघाचा सहभाग असल्याचे कॅमेरा ट्रॅपवरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद करण्याचे आदेश दिले. हे आदेश मिळाल्याने ८ नोव्हेंबरला सकाळपासून लाखापूर येथे पाळत ठेवण्यात आली होती. सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान डॉट मारून वाघाला बेशुद्ध करून पिंजराबंद करण्यात आले. सदर, वाघ दोन ते अडीच वर्षांचा असल्याचे समजते.
तालुक्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उत्तर-दक्षिण वनपरिक्षेत्रात मानव-वन्यजीव संघर्ष नित्याचीच बाब आहे. उत्तर वनपरिक्षेत्रात उपक्षेत्र सायागाटा नियतक्षेत्रामध्ये कक्ष क्र. ११८ मध्ये जगन पानसे (रा. लाखापूर) याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. कॅमेरा ट्रॅपवरून या घटनेत व याआधीच्या सलग तीन मनुष्य हानीच्या घटनांमध्ये स्याम २ या वाघाचा सहभाग असल्याचे दिसून आले.
सदर वाघ जेरबंद करण्याचे आदेश असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे, शूटर अजय मराठे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी कक्ष क्र. ११८ मध्ये वाघावर पाळत ठेवली होती. सायंकाळी वाघाला बेशुद्ध करून पिंजराबंद करण्यात आले. पुढील कारवाई वनविभागाकडून करण्यात येत आहे.