चूक कंत्राटदाराची, शिक्षा जनतेला ; पाणीपुरवठ्याचा प्रश्न पेटला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:19 IST2025-06-18T17:18:50+5:302025-06-18T17:19:36+5:30

भिकेश्वर येथील वास्तव : कंत्राटदाराच्या चुकीचा पालिकेला फटका

The contractor's mistake, the public get punishment; The issue of water supply has flared up! | चूक कंत्राटदाराची, शिक्षा जनतेला ; पाणीपुरवठ्याचा प्रश्न पेटला!

The contractor's mistake, the public get punishment; The issue of water supply has flared up!

घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड :
नगरपरिषद अंतर्गत भिकेश्वर येथे रस्ता व नालीचे काम करताना भिकेश्वरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली. याला आता दोन महिन्यांचा कालावधी होत आहे. मात्र पाइपलाइन दुरूस्त करण्यात न आल्याने भिकेश्वरचा पाणीपुरवठा दोन महिन्यांपासून बंद आहे.


नगरोत्थान योजनेंतर्गत नागभीड नगरपरिषद क्षेत्रात अनेक कामे सुरू आहेत. असेच नाली व सिमेंट रस्त्याचे बांधकाम भिकेश्वर येथेही सुरू आहे. मात्र हे काम करीत असताना कंत्राटदाराने सावधानता न बाळगल्याने भिकेश्वरला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची पाइपलाइन फुटली. पाइपलाइन मोठ्या प्रमाणावर फुटल्याने भिकेश्वर प्रभागाचा पाणीपुरवठा बंद झाला. पाणीपुरवठा बंद होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी होत असला तरी अद्यापही पाइपलाइन दुरुस्त करण्यात आली नाही. परिणामी महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 


टँकरद्वारे पाणीपुरवठा
पाइपलाइन फुटल्याने भिकेश्वर येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली. गावकऱ्यांनी संताप व्यक्त करताच नगरपरिषदेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र अपुरे पाणी मिळत असल्याची महिलांची ओरड आहे. 


ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाईपलाईन फुटली आहे. मात्र अद्यापही दुरुस्ती केली नसल्याने आता पावसाचे दिवस सुरु झाले असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. कंत्राटदारा चूक असतानाही नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाईपलाईन दुरुस्त करून नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.


काँग्रेसने वेधले लक्ष
भिकेश्वर येथे निर्माण झालेल्या या समस्येकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर यांनी नगरपरिषदेस निवेदन देऊन लक्ष वेधले. या निवेदनात कंत्राटदाराने मनमानीपणे काम केल्यामुळेच पाइपलाइन फुटली आहे. यात परिषदेचे नुकसान झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी, चूक कंत्राटदाराची आणि पाणीपुरवठा करण्याचा भुर्दंड नगरपरिषदेवर बसला. त्यामुळे हा खर्च कंत्राटदारांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात वारजूकर यांनी केली आहे. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, माजी नगरसेवक प्रतीक भसीन, माजी नगरसेवक नरेंद्र हेमणे उपस्थित होते.  

Web Title: The contractor's mistake, the public get punishment; The issue of water supply has flared up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.