तब्बल २० तासांनंतर सापडले चारही मित्रांचे मृतदेह; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 10:40 IST2023-07-18T10:40:26+5:302023-07-18T10:40:42+5:30
नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात चार तरुणांना जलसमाधी

तब्बल २० तासांनंतर सापडले चारही मित्रांचे मृतदेह; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश
नागभीड (चंद्रपूर) : रविवारी घोडाझरी तलावात बुडालेल्या चारही तरुणांचे मृतदेह शोधण्यात शोध पथकाला सोमवारी यश आले. तब्बल २० तासांच्या अथक परिश्रमानंतर पहिल्या मृतदेहाचा शोध लागला. पाठोपाठ उर्वरित तीन मृतदेह सापडले. यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी घटनास्थळावरचा नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावणारा होता.
रविवारी दुपारी ३:३० वाजता वरोरा तालुक्यातील आठ युवक नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावावर पर्यटनासाठी आले होते. त्या ठिकाणी सेल्फी काढण्याच्या नादात चेतन भीमराव मांदाडे (वय १७) या तरुणाचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी संकेत प्रशांत मोडक (२२) धावून गेला; पण तोही बुडाला. नंतर धीरज गजानन झाडे (२७) आणि मनीष भारत श्रीरामे (३०) हेही पाण्यात बुडाले. ही घटना सायंकाळी सुमारे ५:३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण महसूल प्रशासन आणि पोलिस विभाग घटनास्थळी दाखल झाला. मात्र, अंधारामुळे मृतदेह शोधण्यास अडचणी येत होत्या.
सोमवारी सकाळी ७:१५ वाजता मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी चंद्रपूरवरून एनडीआरएफची चमू बोलाविण्यात आली. साडेदहा वाजता संकेतचा मृतदेह मिळाला. साडेबारा वाजता चेतनचा, २ वाजता धीरजचा दोन वाजता, तर तीन वाजता मनीषचा मृतदेह सापडला.
शोधमोहिमेत स्वत: पोलिस अधीक्षक
या शोधमोहिमेदरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, प्रभारी तहसीलदार उमेश कावळे उपस्थित होते.