मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:49 IST2025-12-25T13:45:23+5:302025-12-25T13:49:40+5:30
Sudhir Mungantiwar BJP, Chandrapur Municipal Election: सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
Sudhir Mungantiwar BJP, Chandrapur Municipal Election: विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली. आगामी महापालिका निवडणुकांमध्येही मोठा विजय साकारण्याची मनिषा भाजपा नेत्यांनी बाळगली आहे. पण यादरम्यान भाजपामध्ये विविध स्तरावर अंतर्गत कुरबुरी दिसून येऊ लागल्या आहेत. अनेक महिन्यांपासून राज्यातील भाजपा नेतृत्वावर टीका करणारे भाजपाचेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या काही महिन्यांत ते सातत्याने भाजपा आणि पक्षश्रेष्ठींवर उघडपणे टीका करताना दिसत होते. त्यांच्या नाराजीची उघडपणे चर्चा होत होती. पण आज मात्र त्यांनी वेगळेच मत मांडले.
'आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली', असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षावर आगपाखड केली होती. नगरपालिका निवडणुकीनंतर मुनगंटीवार यांनी खदखद व्यक्त केल्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यानंतर भाजपाने एक मोठा निर्णय घेत आमदार किशोर जोरगेवार यांना महापालिका निवडणूक प्रमुखपदावरून हटवले. महापालिका निवडणूक प्रचार सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने भाजपने मुनगंटीवारांचे ऐकत त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा रंगली आहे. याच मुद्द्यावर मुनगंटीवार स्पष्ट बोलले.
"मी नाराज कधीच नव्हतो. हा पक्ष माझा आहे. हे घर, हा पक्ष मोठं करण्यात आम्ही रक्त आटवलं आहे. फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं आहे असा दावा करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे," असे म्हणत मुनगंटीवारांनी आयारामांना सुनावले. जोगरवारांना पदावरून हटवल्याबद्दलही मुनगंटीवारांनी उत्तर दिले. "त्यांना जे पद दिलं होतं ते नगरपरिषदेपुरतं होतं. ते महापालिका निवडणुकीचे प्रभारी आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत आलेली नव्हती. निवडणुका जिंकणे हा जर पद मिळाल्याचा निकाल असायला हवा असेल तर त्यात दोष दिसल्यास चर्चेतून किंवा संवादातून लक्षात आणून द्यायला हवा. तो दुरुस्त होतो," असे अतिशय सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले.