अट्टल दुचाकी चोरट्याच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आठ दुचाकी जप्त
By परिमल डोहणे | Updated: August 19, 2023 15:43 IST2023-08-19T15:38:56+5:302023-08-19T15:43:28+5:30
चोरट्याला पकडण्यात सावली पोलिसांना यश

अट्टल दुचाकी चोरट्याच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आठ दुचाकी जप्त
चंद्रपूर : अत्यंत शिताफीने दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. गडचिरोलीचा चोरटा जवळीलच सावली तालुक्यातील परिसरात जाऊन आपल्या विधिसंघर्षग्रस्त मित्राच्या मदतीने तब्बल आठ दुचाकी चोरल्या. पोलिसांनी त्या सर्व दुचाकी जप्त केल्या असून, त्याला अटक केली आहे. करण मेहश चेरकुरवार (वय १९, रा. इंदाळा, जि. गडचिरोली) असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे.
१७ ऑगस्ट रोजी सावली पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, ठाणेदार आशिष बोरकर यांनी तपासाची चक्रे फिरवली. संशयित आरोपी करण महेश चेरकुरवार याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार विधिसंघर्षग्रस्त बालक दोघे मिळून गडचिरोली व सावली परिसरात मोटरसायकल चोरी करीत असल्याचे सांगितले. त्या चोरट्यांनी ज्यांना ज्यांना दुचाकी विकल्या त्यांच्याकडून आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार दिलीप मोहुर्ले, संजय शुक्ला, पोलिस नाईक मोहन दासरवर, धीरज पिदुरकर, विजय कोटणाके, चंद्रशेखर गंपलवार आदींनी केली.