अजूनही तिथे क्षारयुक्त पाण्याचा शाप मिटेना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:46 IST2024-05-21T13:46:25+5:302024-05-21T13:46:49+5:30
आरोग्य धोक्यातः शुद्ध पाणी मिळणार कधी?

Salty water causing health problems in the village
लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव : उन्हाळा असो की पावसाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या आजही न सुटण्यासारखे कोडे आहे. गावोगावी शासनाने कूपनलिका खोदल्या आहेत; पण त्यामधून येणारे पाणी काही ठिकाणी क्षारयुक्त तर कुठे खारे आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर क्षारयुक्त पाण्याचा शाप कधी मिटेल ? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव हे अंदाजे ३१०० लोकसंख्येचे गाव आहे. या गावात शासनाने मागणीनुसार प्रत्येक ठिकाणी पाण्यासाठी कूपनलिका खोदल्या आहेत; पण त्या कूपनलिकांमधील पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याने कुणीच त्याचा वापर करताना दिसत नाही. फक्त गावातील एकाच बोअरिंगवर सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत अफाट गर्दी असते.
एकाच बोअरिंगचे शुद्ध पाणी पिण्यास योग्य असल्याने संपूर्ण गावाची धाव आता फक्त त्याच पाण्याकडे आहे; पण त्या पाण्यात असलेले क्षार कितपत आपल्या पोटात जात असतील, हे कुणाला माहिती नाही. कारण पाण्याची चव ही गोड असली तरी काही प्रमाणात क्षार पोटात मात्र प्रवेश करतातच.
कोट्यवधी रुपयांचा निधी सामान्य जनतेला शुद्ध पाणी मिळावे म्हणून खर्च केला जातो. त्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या, घरोघरी पाइपलाइन टाकण्यात आली; मात्र पाणी कधी मिळेल, याची गॅरंटी कोणी देत नाही.
निधी खर्च होऊनही पाणी मिळेना !
पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असते; पण त्या पैशांनी सामान्य नागरिकांची पाण्याची समस्या आजही सुटत नसल्याचे वास्तव आहे. शुद्ध पाणी पिण्यासाठी आजही नागरिकांना वाटच बघावी लागत आहे.