चंद्रपुरात नवे सत्ता समीकरण पुढे; भाजपचा उद्धवसेनेला सव्वा-सव्वा वर्षाचा नवा 'सत्ता'फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:43 IST2026-02-05T18:41:38+5:302026-02-05T18:43:12+5:30
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांना सत्तास्थापनेचा अधिकृत प्रस्ताव दिला असला, तरी उद्धवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

New power equation ahead in Chandrapur; BJP offers Uddhav Sena a new 'power' formula of one and a half years
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांना सत्तास्थापनेचा अधिकृत प्रस्ताव दिला असला, तरी उद्धवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
भाजपकडे २३, शिंदे गटाचा एक नगरसेवक असा २४ चा आकडा आहे. त्यात उद्धवसेनेचे सहा, वंचित बहुजन आघाडीचे दोन आणि दोन अपक्ष असे दहा जोडल्यास एकूण ३४ संख्याबळ पूर्ण होते. या संख्येच्या जोरावर भाजपकडून महापालिकेत सत्ता स्थापन करण्याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. आरक्षणाचा विचार करता महापौरपद पहिले सव्वा वर्ष भाजपकडे, तर नंतरचे सव्वा वर्ष उद्धवसेनेकडे देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला आहे. मात्र यावर उद्धवसेनेने मौन बाळगल्याने सत्ता समीकरण अडकले आहे.
दरम्यान, संख्येने सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून तीन मित्रपक्षांसह हा आकडा ३० पर्यंत जातो. मात्र अंतर्गत गटबाजीमुळे अवघ्या चार जागांसाठी काँग्रेस सत्तेबाहेर राहण्याची शक्यता आता बळावली आहे.
उद्धवसेनेची महापौरपदासाठी 'मनस्वी' इच्छा का?
उद्धवसेना पहिल्याच टप्प्यात महापौरपदावर अडून बसल्यामागे वैयक्तिक राजकीय गणित असल्याची चर्चा आहे. उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांच्या पत्नी मनस्वी गिन्हे या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदा महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून, ही संधी उद्धवसेनेसाठी निर्णायक ठरू शकते.
अडीच वर्षानंतर आरक्षण बदलते. त्यावेळी महापौरपद ज्या प्रवर्गासाठी राखीव होईल, तो प्रवर्ग उद्धवसेनेकडे नसेल, तर पुढील अडीच वर्षांत उद्धवसेनेचा महापौर होणे अशक्य ठरेल. त्यामुळे आत्ताच महापौरपद मिळावे, यासाठी उद्धवसेनेचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे.
अखेर काय ठरणार?
महापौरपदाचे आरक्षण आणि वैयक्तिक राजकीय आकांक्षांनी सत्ता संघर्ष अधिक गुंतागुंतीचा झाला असून, अखेर फॉर्म्युला काय ठरतो, याकडे लक्ष लागले आहे.
भाजपचा दावा : प्रस्ताव दिला, प्रतिसादाची प्रतीक्षा
"भाजपकडे २४ नगरसेवक आहेत. उद्धवसेना व मित्रपक्ष मिळून दहा. या आधारावर सव्वा-सव्वा वर्षांचा महापौरपदाचा उद्धवसेनेला प्रस्ताव दिला आहे. त्यांनी हा प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
- किशोर जोरगेवार, भाजप आमदार चंद्रपूर.