महापौरपदाचा तिढा : चंद्रपूर काँग्रेसचा दरबार दिल्लीत; आजच्या बैठकीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:32 IST2026-02-03T12:27:09+5:302026-02-03T12:32:19+5:30
Chandrapur : काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता थेट दिल्लीच्या दरबारी पोहोचली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोन गटांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आता निर्णायक टप्प्यावर आली आहे.

Mayoral race: Chandrapur Congress holds court in Delhi; Focus on today's meeting
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता थेट दिल्लीच्या दरबारी पोहोचली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदासाठीकाँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोन गटांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. दिल्ली दरबारी निघणारा तोडगा दोन्ही गटांना मान्य होणार की संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यासह चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसकडे एकूण २७ नगरसेवक असताना वडेट्टीवार गटाकडे १७, तर धानोरकर गटाकडे ९ नगरसेवक असल्याचे दावे केले जात आहेत. एका महिला नगरसेवकाने दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे मी त्यांच्या सोबत असेल अशी भूमिका घेतल्याचे समजते. महानगरपालिकेचा निकाल जाहीर होताच दोन्ही गटांनी नगरसेवकांची मोट बांधून दावे-प्रतिदावे सुरू केले. दरम्यान, अशा घडामोडी घडल्या. वडेट्टीवार गटावर पाच नगरसेवक पळविण्याचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर दि. २९ जानेवारी रोजी समृद्धी महामार्गावर धानोरकर गटाकडून वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची बस अडविण्याची घटना घडली आणि संघर्ष अधिकच चिघळला. अशातच सोमवारी गटनेता निवडण्याच्या अनुषंगाने वडेट्टीवार गटातील नगरसेवक राजेश अड्डूर यांनी धानोरकर गटातील नगरसेवकांच्या घरांवर बैठकीला येण्याची नोटीस चिटकविली.
या घडामोडींनी दोन्ही गटांतील दुरावा वाढतच चालला आहे. दोन दिवसांनी महापौरपदासाठी नामनिर्देशनपत्र भरायचे आहे, मात्र अद्याप गटनेताच निश्चित झालेला नाही. हा वाद प्रदेश काँग्रेसच्या आवाक्याबाहेर गेला.
या साऱ्या गदारोळानंतर अखेर हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेत्यांची दिल्ली येथे संयुक्त बैठक बोलाविली आहे.
दोन गटांच्या घडामोडी
- घुग्घुस पालिकेत धानोरकर गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला उपाध्यक्षपद देण्याचा आग्रह. यावरून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामध्ये पुन्हा गटबाजीची ठिणगी पडली.
- निवडणुकीत दोन्ही नेत्यांमध्ये तिकीट वाटपावरून मतभेद उघड
- प्रचारादरम्यान जाहीर सभांतून दोन्ही नेत्यांमधील गटाबाजी दिसून आली.
- मनपाचा निकाल लागताच दोन्ही गटांकडून आपापल्या परीने नगरसेवकांची जुळवाजुळव.
- पाच नगरसेवकांना वडेट्टीवार गटाने पळविल्याचा ठपका
- धानोरकर गटाकडून समृद्धी महामार्गावर वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची बस अडविली.
- गटनेता निवडीसाठी वडेट्टीवार गटाकडून धानोरकर गटातील नगरसेवकांच्या घरांवर बैठकीची नोटीस चिटकवली.
- अखेर हा वाद थेट दिल्ली दरबारी.