भाचीच्या वाढदिवसावरून येताना दुचाकीचा अपघात; मामाचा जागीच मृत्यू
By परिमल डोहणे | Updated: April 28, 2023 16:37 IST2023-04-28T16:35:44+5:302023-04-28T16:37:01+5:30
चंद्रपूर - गडचिरोली मार्गावरील घटना : एक जण गंभीर जखमी

भाचीच्या वाढदिवसावरून येताना दुचाकीचा अपघात; मामाचा जागीच मृत्यू
चंद्रपूर : भाचीच्या वाढदिवसावरून परत गावाकडे येताना दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार मामाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघातचंद्रपूर - गडचिरोली मार्गावरील अजयपूरजवळ बुधवारी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात प्रशांत विलास मांढरे (३५, रा. आकाशवाणी रोड, अथर्व कॉलनी, चंद्रपूर) यांचा मृत्यू झाला तर नूतन अरूण आत्राम (२५, रा. अथर्व कॉलनी, चंद्रपूर) हा तरुण जखमी झाला आहे.
प्रशांत मांढरे यांच्या भाचीचा मूल तालुक्यातील आकापूर येथे वाढदिवस होता. वाढदिवसासाठी ते आपल्या एका मित्रासह दुचाकी क्रमांक (एमएच ३४, बीक्यू ७९८५)ने आकापूर येथे गेले होते. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून ते दोघेही रात्री परत चंद्रपूरला येण्यासाठी निघाले. अजयपूरजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली अन् घटनास्थळावरून पलायन केले. या अपघाताची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, रामनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले व त्यांच्या पथकाने लगेच घटनास्थळ गाठले. यावेळी प्रशांत मांढरे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर नूतन आत्राम हा जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुचाकीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाच्या शोधासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी सुरू केली आहे. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले हे करत आहेत.