"महापौर भाजपाचाच करू, नाहीतर विरोधात बसू", सुधीर मुनगंटीवारांची भूमिका, उद्धवसेनेला महापौर पद देण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 16:52 IST2026-01-19T16:50:19+5:302026-01-19T16:52:13+5:30
Chandrapur Municipal election 2026: चंद्रपूर महापालिकेत कुणाचा महापौर बसणार याचे गूढ वाढले आहे. कारण उद्धवसेना ज्या पक्षाला पाठिंबा देईल, त्या पक्षाची सत्ता असणार असे राजकीय गणित तयार झाले आहे.

"महापौर भाजपाचाच करू, नाहीतर विरोधात बसू", सुधीर मुनगंटीवारांची भूमिका, उद्धवसेनेला महापौर पद देण्यास नकार
चंद्रपूर महापालिकेतील सत्ता कायम राखण्यासाठी सध्या भाजपाच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे सर्वाधिक जागा जिंकत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेल्या काँग्रेसलाही बहुमतासाठी चार नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये उद्धवसेना किंगमेकर बनली आहे. अशातच उद्धवसेनेला भाजपा महापौर पद देणार का, याची चर्चा सुरू झाली असून, भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्याला विरोध केला आहे. महापौर भाजपाचाच असेल, नाहीतर आम्ही विरोधी बाकावर बसू, अशी भूमिका मुनगंटीवारांनी मांडली आहे.
चंद्रपूरच्या मतदारांनी असा जनादेश दिला आहे की, कुणाचा महापौर बसणार हे उद्धवसेना कोणाला पाठिंबा देणार यावर ठरणार आहे. त्यामुळे उद्धवसेनेची बार्गेनिंग पावरही वाढली आहे. उद्धवसेनेला महापौर पद दिले जाईल का? याबद्दलही चर्चा सुरू असून, तशी भूमिका भाजपा घेणार नाही, असे मुनगंटीवारांनी स्पष्ट केले आहे.
सुधीर मुनगंटीवार काय बोलले?
माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, "अनेक अपक्ष नगरसेवक किंवा इतर नगरसेवक संपर्कात आहेत. तुम्ही जर भारतीय जनता पार्टी महापौर बनवत असाल, तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. चर्चा सुरू आहे. संवाद सुरू आहे."
"महापौर पद हे कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणलाही देता येतच नाही. आवश्यकता असेल, तर आम्ही विरोधात बसू. आम्ही विरोधात बसून आमच्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये जीव ओतून काम करू. शहराच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी महापौर भाजपाचाच करावा लागेल", अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे.
काँग्रेसकडूनही हालचाली
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चंद्रपूरमध्ये चांगले यश मिळाले आहे. भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसने २७ जागा जिंकल्या आहेत. चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ३४ आहे. काँग्रेसने जनविकास सेनेला सोबत घेत ही निवडणूक लढली होती. त्यांना ३ जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस आणि जविसेना यांच्या एकूण जागा ३० आहेत. तर सत्ता स्थापनेसाठी अजून ४ जागांची गरज आहे. उद्धवसेनेने पाठिंबा दिल्यास काँग्रेसची चिंता मिटणार आहे. त्यामुळे उद्धवसेनेकडून राजकीय वाटाघाटीत अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
भाजपाला फटका
मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला यावेळी मोठा फटका बसला आहे. गेल्यावेळी भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले होते. भाजपाने ३६ जागा जिंकल्या होत्या. पण, यावेळी त्यांच्या तब्बल १३ जागा कमी झाल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षाला गेल्यावेळी अवघ्या १२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांनी २७ जागा जिंकल्या असून, १५ जागा वाढल्या आहेत.
स्थानिक नेत्यांचा लागणार कस
चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेसाठी आता स्थानिक नेतृत्वाची खरी कसोटी आहे. काँग्रेसकडून विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जबाबदारी येऊन ठेपली आहे. संख्याबळ असूनही बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य राजकीय खेळी, विश्वासार्ह युती आणि नाराज घटकांना सोबत घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
दुसरीकडे भाजपकडून ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांचाही कस लागणार आहे. अंकगणित अनुकूल करण्यासाठी उद्धवसेनेसह छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवताना त्यांची राजकीय कौशल्ये पणाला लागणार आहेत. अखेरीस चंद्रपूरच्या सत्तेचा किल्ला कुणाच्या हाती जाणार, हे या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाने आखलेल्या डावपेचांवरच ठरणार असून, कोणता नेता सत्ता स्थापनेच्या रणांगणात सरस ठरतो याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.