एम. टेकच्या विद्यार्थ्याने पळविली सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोकड, सीसीटीव्हीतून प्रकार उघड
By परिमल डोहणे | Updated: August 18, 2023 16:42 IST2023-08-18T16:40:22+5:302023-08-18T16:42:24+5:30
एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एम. टेकच्या विद्यार्थ्याने पळविली सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोकड, सीसीटीव्हीतून प्रकार उघड
चंद्रपूर : एम. टेकचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने कुलूपबंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोकड पळविल्याची घटना रामनगर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी त्या चोरट्याने लंपास केलेला एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आशिष उर्फ आशू श्रीनिवास रेड्डीमल्ला (२५) रा. बिना अपार्टमेंटच्या मागे, रयतवारी कॉलनी, चंद्रपूर असे त्या चोरट्याचे नाव आहे. यापूर्वीही त्याने चोरी केली असल्याची माहिती आहे.
शास्त्रकार ले-आऊट येथील रहिवासी औषध विक्रेता कुलदीप कुमार हरिनारायण गुप्ता हे ११ ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह बल्लारपूर येथे गेले होते. कुलूपबंद घर बघून चोरट्याने रोकड २० हजार, सोन्याची चैन, अंगठी, सोन्याचा हार, कानातील टॉप्स असा ऐवज पळविला होता. याबाबतची तक्रार त्यांनी रामनगर पोलिस स्टेशनमध्ये दिली. रामनगर गुन्हे शोध पथकाने तपास करुन आशिष उर्फ आशू श्रीनिवास रेड्डीमल्ला याला अटक करुन त्याच्याकडून चोरी केलेली रोकड व दागिने असा एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, एसडीपीओ सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राजेश मुळे, पोलिस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे एपीआय हर्षल एकरे व त्यांच्या पथकाने केली.
सीसीटीव्हीतून चोरटा सापडला
रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होताच रामनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व त्यांच्या चमूने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली. यावेळी संशयित आढळून येताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली, तसेच त्याच्याकडील सर्व मुद्देमाल जप्त केला.