सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:23 IST2025-12-25T11:19:47+5:302025-12-25T11:23:49+5:30
Sudhir Mungantiwar: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये सत्तेत असूनही भाजपला चंद्रपूर जिल्ह्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. निकाल लागल्यानंतर मुनगंटीवार यांनी पक्षालाच खडेबोल सुनावले होते. त्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीनंतर मुनगंटीवारांची नाराजी दूर केल्याचे दिसत आहे.

सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
Chandrapur Municipal Election: "आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली", असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वपक्षावर आगपाखड केली होती. नगरपालिका निवडणुकीनंतर मुनगंटीवार यांनी खदखद व्यक्त केल्यानंतर मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. त्यानंतर भाजपने एक मोठा निर्णय घेत आमदार किशोर जोरगेवार यांना महापालिका निवडणूकप्रमुखपदावरून हटवले आहे. महापालिका निवडणूक सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने भाजपने मुनगंटीवारांचं ऐकत त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा रंगली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. पण, चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला चांगली कामगिरी करता आली नाही. या निकालानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाला खडेबोल सुनावले होते. त्यानंतर भाजपने चंद्रपूर महापालिका निवडणूकप्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवले आहे.
मुनगंटीवार-जोरगेवार संघर्ष
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात आधीपासूनच संघर्ष आहे. अपक्ष आमदार असताना किशोर जोरगेवार यांना भाजपमध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून विरोध केला होता. आम्ही फक्त संतरज्या उचलायच्या का, अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याचे मुनगंटीवार म्हणाले होते. पण, पक्षाने त्यांचा विरोध डावलून जोरगेवार यांना पक्षात प्रवेश दिला.
२०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्षात घेण्यात आले होते. त्यानंतर मुनगंटीवार-जोरगेवार यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुनगंटीवार यांनी यावरून पक्षाला घरचा आहेर दिला होता. 'जसे शनिशिंगणापूरला दरवाजे नाहीत, तसे आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत. कोणीही येतो, कोणीही जातो', असे म्हणत मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
माजी खासदार संचेतींकडे जबाबदारी
सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीची पक्षाकडून दखल घेण्यात आली. मुंबईमध्ये मुनगंटीवार यांची पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर भाजपकडून चंद्रपूर महापालिका निवडणूकप्रमुख पदावरून जोरगेवार यांना हटवण्यात आले. त्यांच्याऐवजी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.