चंद्रपूरचा टायगर जिवंत, मग गडचिरोलीत मेलेला का? काँग्रेसच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, खासदार धानोरकर संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:14 IST2025-12-26T16:13:50+5:302025-12-26T16:14:57+5:30
मुंबईतल्या संसदीय बोर्ड बैठकीत गुरुवारी काँग्रेसमध्ये घमासान झाल्याची चर्चा झाली.

चंद्रपूरचा टायगर जिवंत, मग गडचिरोलीत मेलेला का? काँग्रेसच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, खासदार धानोरकर संतापल्या
Pratibha Dhanorkar : चंद्रपूरमध्ये 'टायगर जिवंत आहे', असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी विजयाचे श्रेय घेतले, मग गडचिरोलीत टायगर मेलेला होता का? गडचिरोली हा माझा लोकसभा मतदारसंघ नाही का? अशा शब्दात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संताप व्यक्त केला.
मुंबईत गुरुवारी झालेल्या काँग्रेस संसदीय बोर्डाच्या बैठकीत त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली. नगरपरिषद निवडणुकांतील चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या यशाचे श्रेय केवळ आमदार विजय वडेट्टीवार यांनाच दिले जात असल्याच्या मुद्द्यावरून बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वर्चस्वाची लढाई उघडपणे समोर आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्षांनी वारंवार विनंती करूनही खासदार धानोरकर शांत झाल्या नाहीत. निवडणूक निर्णयांमध्ये विश्वासात न घेता कट रचल्याचा, तसेच आगामी निवडणुकीत तिकीट कापण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर व बल्लारपूर शहराध्यक्ष बदलताना अंधारात ठेवले, तसेच मनपा निवडणुकीसाठी यशोमती ठाकूर यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करताना विश्वासात घेतले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
या गोंधळादरम्यान नसीम खान, यशोमती ठाकूर यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, धानोरकर बैठक सोडून बाहेर पडल्याची माहिती आहे. सुमारे २० मिनिटे ही बैठक गोंधळात गेली. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार मात्र शांतपणे बसून होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
धानोरकरांवरही आरोप
चंद्रपूर विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांनीही खासदार धानोरकर यांच्यावर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष व पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी अपक्ष उभे केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.