भाजपच्या यादीत फेरफार; प्रदेशाध्यक्षांनी दिलेली चंद्रपूरची उमेदवार यादी डावलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 12:52 IST2026-01-01T12:49:35+5:302026-01-01T12:52:01+5:30
Chandrapur : नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये सुरू झालेल्या भूकंपाचे धक्के आता थेट महानगरपालिका निवडणुकीत उमटले आहेत.

Changes in BJP list; Chandrapur candidate list given by state president rejected
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये सुरू झालेल्या भूकंपाचे धक्के आता थेट महानगरपालिका निवडणुकीत उमटले आहेत. मनपा निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेल्या अंतिम उमेदवार यादीला धुडकावून लावत मनमानी पद्धतीने उमेदवारी वाटप केल्याचा ठपका ठेवत भाजप शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोटुवार यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करत त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आले. या कारवाईमुळे चंद्रपूर भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
कासनगोड्डवार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे खंदे समर्थक मानले जात असल्याने या कारवाईकडे जोरगेवार गटाला दिलेला थेट राजकीय झटका म्हणून पाहिले जात आहे. या पत्राची प्रत कासनगोटुवार यांच्यासह विदर्भ विभाग संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागांपैकी ४ जागा मित्रपक्षांसाठी सोडून भाजपने उर्वरित ६२ जागांवरील उमेदवारांची अंतिम यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली होती. ही यादी शहर जिल्हाध्यक्ष या नात्याने कासनगोट्टवार यांच्याकडे अधिकृतरीत्या पाठविण्यात आली होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
नागपुरात दोन दिवस झालेल्या वादळी बैठकीनंतर चंद्रपूर पालिकेसाठी उमेदवारांची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठविण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंतिम यादी म्हणून ती जाहीरही केली. निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी या यादीतून तब्बल १४ उमेदवारांची नावे परस्पर वगळल्याचा आरोप पक्षांतर्गत पातळीवर करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष,पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ प्रदेश नेत्यांनी ठरवलेली यादी बाजूला ठेवून मर्जीतील आणि विश्वासातील उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचे आरोप झाले. परिणामी पक्षाला बंडखोरीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मनपा निवडणुकीच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर झालेल्या या घडामोडींमुळे भाजपची संघटनात्मक प्रतिमा डागाळली असून, याचा सर्वाधिक फटका आमदार किशोर जोरगेवार यांना बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पद रिक्त, प्रभार नाही
प्रदेशाध्यक्षांच्या यादीतील उमेदवार बदलण्याच्या प्रकारामुळे भाजपमध्ये बंडखोरीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब थेट पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आली. परिणामी ३१ डिसेंबर रोजी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने कासनगोडुवार यांच्यावर पदमुक्तीची कारवाई करण्यात आली. मात्र, त्यांच्या जागी कुणाला प्रभार देण्यात आला, याचा उल्लेख पत्रात नसल्याने संभ्रम कायम आहे.