तुमचा फॉर्म भरण्यासाठी वडेट्टीवारांना बोलावणार?; प्रतिभा धानोरकर स्पष्टच बोलल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 05:00 PM2024-03-25T17:00:47+5:302024-03-25T17:02:27+5:30

विजय वडेट्टीवार यांना तुमचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निमंत्रण देणार का, असा प्रश्न प्रतिभा धानोरकर यांना विचारण्यात आला होता.

Calling Vadettivar to fill your form?; Dhanorkar clearly spoke... | तुमचा फॉर्म भरण्यासाठी वडेट्टीवारांना बोलावणार?; प्रतिभा धानोरकर स्पष्टच बोलल्या...

तुमचा फॉर्म भरण्यासाठी वडेट्टीवारांना बोलावणार?; प्रतिभा धानोरकर स्पष्टच बोलल्या...

Congress Pratibha Dhanorkar ( Marathi News ) :चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काल काँग्रेसने आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांत तिकिटावरून धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा संघर्ष रंगला होता. आता काँग्रेसने अधिकृत उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे धानोरकर यांचा प्रचार करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रतिभा धानोरकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 

विजय वडेट्टीवार यांना तुमचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निमंत्रण देणार का, असा प्रश्न विचारला असता प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, "आमचा पक्ष लोकशाहीवर आणि राज्यघटनेवर चालणारा पक्ष आहे. त्यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षश्रेष्ठींनी मला जो आदेश दिला असता, त्याचं पालन मी केलं असतं. आता मला उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन विजय वडेट्टीवार हे करतील. आमची लढाई संविधान वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळे अगदी तळागाळातील कार्यकर्तेही एकत्र येऊन काम करतील. उमेदवारी अर्ज आम्ही २७ मार्च रोजी दाखल करणार आहोत. अर्ज भरण्यासाठी आम्ही जिल्ह्यातील आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार यांना निमंत्रण देणार आहोत. तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही आम्ही निमंत्रण देणार आहोत. ते अर्ज भरण्यासाठी तिथं येतील," असा विश्वास धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

काँग्रेसचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर या गेल्या अनेक महिन्यांपासून चंद्रपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असताना काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनीही पक्षाकडे तिकिटाची मागणी केल्याने तिढा निर्माण झाला होता. मात्र काँग्रेस नेतृत्वाने अखेर हा तिढा सोडवत प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे वडेट्टीवार नाराज झाले का, अशी चर्चा रंगत असताना विजय वडेट्टीवार यांनी खुलासा केला आहे. "मला जिथे-जिथे जाता येईल तिथे मी जाणार आहे. पक्षाने जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. तिकीट मागण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, तसा तो शिवानीलाही होता. आता पक्षाने निर्णय घेतला असून पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असतो," असं वडेट्टीवार म्हणाले. 

दरम्यान, "मी महाराष्ट्राचा नेता आहे, मला राज्यभर काम करायचं आहे. देशात भाजपची घोडदौड रोखण्याचं काम महाराष्ट्र करणार आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्रच उभा राहिला आहे. दिल्लीच्या तख्ताला हादरे देण्याचं काम महाराष्ट्राने केलं आहे. विदर्भातील सर्वच मतदारसंघातील काँग्रेसच्या विजयात माझा वाटा असेल, कारण मी आता विधानसभेचा विरोधी पक्षनेता असल्याने जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलो नसून राज्याचा नेता झालो आहे," अशी भूमिकाही विजय वडेट्टीवारांनी मांडली आहे.

Web Title: Calling Vadettivar to fill your form?; Dhanorkar clearly spoke...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.