तब्बल ५३ कोट्यधीश उमेदवार मनपा निवडणुकीच्या मैदानात; कोणत्या पक्षाचे उमेदवार सर्वात श्रीमंत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 20:25 IST2026-01-10T20:24:18+5:302026-01-10T20:25:00+5:30
Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात ४५१ पैकी ५३ उमेदवार कोट्यधीश असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रातून स्पष्ट झाले आहे.

As many as 53 crorepati candidates in municipal elections; Which party's candidate is the richest?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात ४५१ पैकी ५३ उमेदवार कोट्यधीश असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रातून स्पष्ट झाले आहे. कोट्यधीश असलेले बहुतांश उमेदवार भाजपशी संबंधित असून, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष १३ उमेदवारांकडे एकही रुपये नसल्याची नोंद शपथपत्रात करण्यात आली आहे.
नामांकन अर्ज दाखल करताना, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवारांना शपथपत्र सादर करणे बंधनकारक आहे. १५ जानेवारी रोजी निवडणुकीसाठी ४५१ उमेदवारांनी महानगर पालिका निवडणूक प्रशासनाकडे शपथपत्र सादर केले. त्यानुसार, उमेदवारांची ही माहिती प्रशासनाने परिशिष्ट-१ मध्ये प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये शैक्षणिक पात्रता, जंगम व स्थावर मालमत्ता, कर्ज, दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकेल, अशी गुन्हेगारी प्रकरणे व ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले आणि एक वर्षे किंवा त्यापेक्षा कालावधीच्या कारावासाची शिक्षा झाले असेल, अशा प्रकरणांची नोंद करणे शपथपत्रात बंधनकारक होते.
२०१७ च्या तुलनेत वाढली उच्चशिक्षितांची संख्या
२०१७ मध्ये मनपाचा कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल आठ वर्षानंतर यंदा निवडणूक होत आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरूण उमेदवारांची यावेळी संख्या वाढली. एम.ए. बीएसस्सी, एमएस्सी, एम.कॉम., एम.एस.डब्लू,, बी. एड., एलएलबी, अभियांत्रिकी व व्यवस्थापन शास्त्र, शाखेची पदवी घेऊन निवडणूक लढविणाऱ्याची संख्या १६२ आहे. २०१७ च्या तुलनेत ही संख्या बरीच वाढली आहे.
दोन वर्षे शिक्षेची प्रलंबित प्रकरणे कुणावर ?
दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकेल, अशी एकूण ६० जणांवर ६८ प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक १७ प्रकरणे बंगाली कॅम्प प्रभागातील अपक्ष उमेदवार अजय सरकार आणि वडगाव प्रभागातील उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमूख यांच्यावर १० प्रकरणे आहेत. काही महिला उमेदवारांचीही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याची नोंद शपथपत्रात आढळून आली.
१३ उमेदवारांकडे रुपयाही नाही
निवडणूक लढविणाऱ्या १३ उमेदवारांकडे जंगम व स्थावर मालमत्ता निरंक असल्याची नोंद शपथपत्रात केली आहे. यामध्ये महाकाली प्रभागातील अ. १२ मधील उमेदवारांची संख्या अधिक आहे.
माजी महापौरांमध्ये राखी कंचर्लावार श्रीमंत
माजी महापौर व भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांच्याकडे ८ कोटी ८५ लाख १७ हजार जंगम व १ कोटी १३ लाख ४ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. काँग्रेसच्या उमेदवार व पहिल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांच्याकडे ५१ लाख २६ हजार जंगम व १७ लाख स्थावर मालमत्ता असून, १२ लाख ३९ हजारांचे कर्ज आहे. अंजली घोटेकर यांच्याकडे २९ लाख ८० हजार जंगम व ८६ लाख ८० हजारांची स्थावर मालमत्ता आहे. माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया यांच्याकडे १ कोटी ४१ लाखांची जंगम तर १ कोटी ७३ लाखांची स्थावर मालमत्ता व ३० लाख ६७ हजारांचे कर्ज आहे.