काय सांगता; आता शुभमंगल सावधान, २५ जूननंतरच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:02 IST2024-05-08T16:01:04+5:302024-05-08T16:02:16+5:30
२३ वर्षांनंतर ही परिस्थिती: यंदा विवाहाचे मुहूर्त गेल्या वर्षीपेक्षा कमी

According to shastra now wedding dates, only after 25th June...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षी मे आणि जून महिन्यात विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांनी एप्रिलमध्येच लग्नाचा बार उडवून टाकला. ३ मे ते २५ जूनपर्यंत एकही विवाह मुहूर्त नसल्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लग्नकार्य नसल्यामुळे सर्वच क्षेत्रांतील व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
मे आणि जून महिन्यांत लग्नकार्य नसल्यामुळे बँडवाल्यांपासून ते मंडप डेकोरेशन, मंगल कार्यालय, लॉन, आचारी, केटरर्स, पुरोहित, छायाचित्रकारांपर्यंत आदी लग्नकार्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक झळ बसणार आहे. मे आणि जून महिन्यांत लग्न तारखा नसल्यामुळे या दिवसांत काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावर्षी विवाहाचे योग गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत. दरवर्षी मे आणि जून महिन्यांत विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात पार पडतात. यंदा मात्र मे जूनमध्ये गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा एकत्रित अस्त असल्याने या काळात मंगलकार्य करू नये, असे शास्त्र सांगते. दोघांचा एकत्रित अस्त असल्याने आता २५ जूननंतर मुहूर्त आहेत. अशी परिस्थिती २३ वर्षानंतर पहिल्यांदा आली आहे.
वेळ आणि सोयीनुसार लग्न
बहुतांश कुटुंब लग्न तसेच अन्य शुभकार्य मुहूर्त बघूनच करतात. मात्र काही कुटुंबे यावर विश्वास ठेवत नाही. आपल्या सोयीनुसार आणि वेळेनुसार लग्नकार्य उरकून घेतात. त्यामुळे मुहूर्त नसले तरी काही कुटुंबात लग्नकार्य पार पाडले जात आहे. मात्र मुहूर्त न बघता लग्नकार्य करणाऱ्यांची संख्या आजही बरीच कमी आहे.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त
■ यंदा विवाहासाठी एप्रिलपासून डिसेंबरपर्यंत ६५ मुहूर्त आहेत. काही कुटुंबे मुहूर्त न बघ बघताच लग्नकार्य आटोपण्याच्या मनःस्थितीत आहेत.
■ मे, जून महिन्यामध्ये फारसे मुहूर्त नसल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी मुलांचे लग्न एप्रिल- मध्येच आटोपून घेतले. मात्र जे कुटुंब मुहूर्त बघूनच लग्न करतात आणि नुकतेच लग्न जुळले आहे, अशा कुटुंबीयांना मुहूर्तासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
■ मे महिन्यात अवघे दोन दिवस मुहूर्ताचे होते. २५ जूननंतर लग्नाचे मुहूर्त आहेत.