Crude Oil From Strait of Hormuz : मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने इशारा दिला आहे की, परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास या मार्गातून एक थेंब तेलही बाहेर जाऊ दिले जाणार नाही. तज्ज्ञांच्या मते, जर हा महत्त्वाचा समुद्री मार्ग बंद झाला, तर जागतिक बाजारात तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो आणि इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
होर्मुज सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का?
होर्मुज सामुद्रधुनी हा पर्शियन गल्फ आणि अरब समुद्राला जोडणारा अरुंद समुद्री मार्ग आहे. याची रुंदी सुमारे ३३ किलोमीटर आहे. मात्र इतक्या छोट्या मार्गातून जगातील सुमारे २० ते २५ टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. याशिवाय मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूची वाहतूकही याच मार्गाने होते. सौदी अरेबिया, इराक, कुवैत, कतार आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांसारखे प्रमुख तेल उत्पादक देशांची तेल निर्यात या मार्गावर अवलंबून आहे.
भारतासाठीही हा मार्ग महत्त्वाचा
भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठीही होर्मुज सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे. भारत आयात करत असलेल्या एकूण कच्च्या तेलापैकी सुमारे ४० टक्के तेल या मार्गाने येते. त्यामुळे या भागात तणाव वाढल्यास भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.
जगातील सर्व तेल होर्मुजवर अवलंबून नाही
दरम्यान, जगभरात दररोज सुमारे १०० दशलक्ष बॅरल तेलाची गरज असते. त्यापैकी केवळ २०-२५ टक्के तेल होर्मुज सामुद्रधुनीतून जाते. उर्वरित तेल विविध समुद्री मार्ग आणि पाइपलाइनद्वारे इतर देशांपर्यंत पोहोचवले जाते. ऊर्जा व्यापारातील अशा महत्त्वाच्या समुद्री मार्गांना ‘ऑइल चोकपॉइंट्स’ असे म्हटले जाते.
मलक्का सामुद्रधुनी: आशियातील व्यस्त मार्ग
स्ट्रेट ऑफ मलक्का हा मलेशिया आणि इंडोनेशिया दरम्यान असलेला समुद्री मार्ग आहे. हा जगातील सर्वाधिक व्यस्त समुद्री मार्गांपैकी एक मानला जातो. २०२५ मध्ये या मार्गातून दररोज सुमारे २३ दशलक्ष बॅरल तेल वाहतूक झाले. अफ्रिका, अमेरिका आणि रशियातून आशियाकडे जाणारे अनेक तेल टँकर याच मार्गाचा वापर करतात.
सुएझ कालवा: युरोपसाठी महत्त्वाचा मार्ग
सुएझ कालवा रेड सी आणि मेडिटेरेनियन समुद्राला जोडतो. युरोप आणि अमेरिकेत तेल पोहोचवण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नायजेरिया आणि अंगोला यांसारख्या आफ्रिकन देशांचे तेलही याच मार्गाने युरोपपर्यंत पोहोचते.
बाब-अल-मंदेब: रेड सीचे प्रवेशद्वार
बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी येमेन आणि जिबूती यांच्या दरम्यान आहे. हा मार्ग सुएझ कालव्याकडे जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार मानला जातो. या मार्गातून दररोज लाखो बॅरल तेलाचे टँकर जातात.
तुर्किश सामुद्रधुनी: रशियाचा मार्ग
तुर्किश स्ट्रेट्स ब्लॅक सी आणि मेडिटेरेनियन समुद्राला जोडतात. रशिया, कझाकस्तान आणि अझरबैजान या देशांमधील तेल बहुधा याच मार्गाने युरोप आणि इतर भागांपर्यंत पोहोचते.
डॅनिश स्ट्रेट्स आणि नॉर्थ सी मार्ग
डॅनिश स्ट्रेट्स या समुद्री मार्गातून नॉर्वे आणि युनायटेड किंगडम येथील तेलाची निर्यात केली जाते. युरोपच्या ऊर्जा बाजारासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
केप ऑफ गुड होप: पर्यायी मार्ग
आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला असलेला केप ऑफ गुड होप हा पर्यायी समुद्री मार्ग आहे. रेड सी किंवा सुएझ कालव्यामध्ये अडथळे निर्माण झाल्यास अनेक तेल टँकर या मार्गाने वळसा घालून युरोप आणि आशियात पोहोचतात.
होर्मुजवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न
काही देशांनी होर्मुज सामुद्रधुनीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी पाइपलाइन विकसित केल्या आहेत. त्यामध्ये सौदी अरेबियाची ईस्ट-वेस्ट पाइपलाइन आणि यूएईची हबशन-फुजैराह पाइपलाइन यांचा समावेश आहे. या पाइपलाइनद्वारे दररोज लाखो बॅरल तेल थेट रेड सी किंवा गल्फ ऑफ ओमान पर्यंत पोहोचवता येते.
