Stock Markets Today: बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात प्रचंड घसरणीसह झाली. बाजार उघडल्यानंतर लगेचच सेन्सेक्स ४७० अंकांनी खाली येत ७८,८०२ च्या पातळीवर व्यवहार करू लागला. निफ्टीमध्येही १२१ अंकांची घसरण होऊन तो २४,४५५ वर पोहोचला, तर बँक निफ्टी २०२ अंकांनी घसरून ५७,१६८ वर व्यवहार करत होता. मिडकॅप सिलेक्टमध्ये ४० अंकांची घट दिसून आली असून आयटी इंडेक्समध्ये ३ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली आहे.
विशेषतः एचसीएल टेकचा शेअर ३ टक्क्यांनी कोसळला. सकाळी ९:३० च्या सुमारास सेन्सेक्स ५१६ अंकांनी घसरून ७८,७५६ वर होता, तर निफ्टी १३० अंकांनी खाली २४,४४६ वर व्यवहार करत होता. बँक निफ्टीमध्ये १७३ अंकांची घट होऊन तो ५७,१९८ वर होता, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला.
इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
कोणत्या शेअर्समध्ये तेजी / घसरण?
क्षेत्रनिहाय कामगिरीचा विचार करता ऑटो, NBFC, फार्मा, खासगी बँका आणि हेल्थकेयर यांसारखे निर्देशांक लाल निशाण्यात व्यवहार करत होते. याउलट एफएमसीजी, मीडिया, मेटल, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, रियल्टी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली. निफ्टी ५० वर नेस्ले, हिंदाल्को, अदानी एंटरप्राइजेस, TMPV, एसबीआय लाईफ, एनटीपीसी, ओएनजीसी आणि टाटा कन्झ्युमर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. दुसरीकडे एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डी, पॉवर ग्रिड आणि एशियन पेंट या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
बाजार उघडण्यापूर्वीचे संकेत काहीसे संमिश्र होते. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवल्यामुळे जागतिक स्तरावर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष चर्चेबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांवर दबाव निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, जागतिक बाजारपेठेतील कमकुवत स्थिती आणि परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची हालचाल आज बाजाराची पुढची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
युद्धविराम वाढला
हॉर्मुजमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी कोणतीही मुदत निश्चित न करता युद्धविराम वाढवला आहे. इराण सरकारनं युद्ध संपवण्यासाठी एकत्रितपणे प्रस्ताव सादर करावा, अशी प्रतीक्षा केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या चर्चेबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे बाजारपेठेत अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे.
