lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारांचा संवेदनशील निर्देशांक प्रथमच ४४ हजार

शेअर बाजारांचा संवेदनशील निर्देशांक प्रथमच ४४ हजार

सलग तिसऱ्या सत्रात उसळी : गुंतवणूकदारांचा ओढा, कोरोनाची कमी होत असलेली भीती कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 12:28 AM2020-11-19T00:28:58+5:302020-11-19T00:29:09+5:30

सलग तिसऱ्या सत्रात उसळी : गुंतवणूकदारांचा ओढा, कोरोनाची कमी होत असलेली भीती कारणीभूत

Sensitive stock market index 44,000 for the first time | शेअर बाजारांचा संवेदनशील निर्देशांक प्रथमच ४४ हजार

शेअर बाजारांचा संवेदनशील निर्देशांक प्रथमच ४४ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडवली बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात उसळी घेत ४४ हजारांचा आकडा पार केला. परकीय गुंतवणूकदारांचा वाढलेला ओढा आणि कोरोना कहराचा आटत चाललेला प्रभाव यामुळे भांडवली बाजार सद्य:स्थितीत तेजी अनुभवत आहे. 


बँकिंग, ऑटो आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातील समभागांच्या किमती वाढल्याचे बुधवारच्या सत्रात निदर्शनास आले. दरम्यान, निफ्टी निर्देशांकही १३ हजार अंकाच्या दारात उभा आहे. बुधवारी व्यवहार संपले त्यावेळी निफ्टी निर्देशांक १२,९३८.२५ अंकांवर स्थिरावला. 


कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस दृष्टिपथात येण्याच्या वार्तेने मंगळवारी ४४ हजारांच्या दिशेने झेपावलेेला निर्देशांक ४३,९५२ अंकांवर स्थिरावला होता. मात्र, बुधवारी सत्र सुरू होताच निर्देशांकाने ४४ हजारांचा ऐतिहासिक उच्चांक ओलांडला. ४४,२१५.४९ अंकांवर पोहोचलेला निर्देशांक व्यवहार बंद झाले त्यावेळी ४४,१८०.०५ अंकांवर स्थिरावला. महिंद्रा आणि महिंद्राच्या समभागांत १० टक्के एवढी घसघशीत वाढ झाली. एल ॲण्ड टी, इंड‌्सइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक आणि ॲक्सिस बँक यांचे समभागही तेजीत राहिले तर हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, टायटन, टीसीएस, भारती एअरटेल आणि इन्फोसिस यांच्या समभागांनी २ टक्क्यांपर्यंत आपटी अनुभवली. 


तसेच मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांची जोरदार खरेदी झाल्याचे निदर्शनास आले. दिवाळीच्या आधीपासूनच कोरोनावरील लस येण्याची अपेक्षा निर्माण झाल्यापासून शेअर बाजार वाढतांना दिसून येत आहे. 
याच काळात बाजार ४१ हजार ५०० अंशपासून वाढत वाढत ४४ हजार अंशायर्यंत पोहचला आहे. 


सकारात्मक संकेत
n आंतरराष्ट्रीय बाजारातून येत असलेले सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता ओढा तसेच देशात टाळेबंदी उठविल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात सुरू झालेले व्यवहार यांचा एकत्रित परिणाम भांडवली बाजारावर आढळून आला. 

Web Title: Sensitive stock market index 44,000 for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.