मुंबई : विधानसभा निवडणुकीचे कल आणि कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा सरस आलेले तिमाही निकाल यामुळे सोमवारी शेअर बाजारात दमदार तेजी पाहायला मिळाली. यामुळे सेन्सेक्स ३५६ अंकांच्या वाढीसह ७७,२६९ वर बंद झाला, तर निफ्टीने १२१ अंकांची झेप घेत २४,११९ चा स्तर गाठला.
गुरुवारच्या पडझडीनंतर सकाळी बाजार उघडताच खरेदीचा जोर दिसून आला. सत्रादरम्यान सेन्सेक्सने ९९७ अंकांची उसळी मारत ७७,९१० चा उच्चांक गाठला होता, मात्र उत्तरार्धात झालेल्या नफेखोरीमुळे ही वाढ काहीशी मर्यादित राहिली.
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि युद्ध याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. सोमवारी भारतीय रुपयाने नीचांकी पातळी ओलांडली असून, तो ३९ पैशांनी कोसळून प्रति डॉलर ९५.२३ या ऐतिहासिक निचांकी स्तरावर बंद झाला.
वाढलेले शेअर्स
अदानी पोर्टस् I हिंदुस्तान युनिलिव्हर I रिलायन्स इंडस्ट्रीज I लार्सन अँड टुब्रो I एटरनल I मारुती
सर्वाधिक घसरण
भारती एअरटेल I कोटक महिंद्रा बँक I टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस I आयटीसी
डॉलरची मागणी वाढल्यास रुपया ९५.७० पर्यंत खाली जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बाजार वधारण्याची प्रमुख कारणे कोणती?
बंगालमधील निवडणुकीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार लागल्याने राजकीय स्थैर्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.
चौथ्या तिमाहीतील कंपन्यांची कामगिरी समाधानकारक असल्याने ब्ल्यू-चिप शेअर्सना मागणी वाढली. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे दर ११० डॉलरच्या खाली राहिल्याने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेतील टेक निर्देशांकांची विक्रमी वाढ झाली.
