Post Office Investment Scheme: प्रत्येक गुंतवणूकदाराची इच्छा असते की आपल्या पैशांवर जोखीम शून्य असावी आणि परतावा भरपूर मिळावा. जर तुम्हीही अशाच सुरक्षित आणि फायदेशीर योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची ही सरकारी योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये मिळतील. विशेष म्हणजे, ५ वर्षांनंतर तुम्ही तुमची मूळ रक्कम परतही मिळवू शकता.
काय आहे ही मंथली इनकम स्कीम ?
आम्ही पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीम (MIS) बद्दल बोलत आहोत. ही योजना गुंतवणूकदारांना दरमहा गॅरंटीड परतावा देते आणि तुमची गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. ज्यांना जोखीम न पत्करता गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असतो आणि एक वर्षानंतर पैसे काढण्याचा पर्यायही यामध्ये उपलब्ध आहे.
ही योजना कशी काम करते?
या योजनेची मॅच्युरिटी ५ वर्षांची आहे. मुदत पूर्ण झाल्यावर तुम्ही तुमचे पूर्ण पैसे काढू शकता. वैयक्तिकरित्या एक व्यक्ती ९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. तर, तीन लोक मिळून संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. पालक आपल्या अल्पवयीन मुलांच्या नावानेही हे खातं उघडू शकतात.
दरमहा किती परतावा मिळणार?
जर एखाद्या व्यक्तीने ९ लाख रुपये गुंतवले, तर त्याला पुढील ५ वर्षांसाठी दरमहा ५,५५० रुपये मिळतील. म्हणजेच वार्षिक ६६,६०० रुपये परतावा मिळेल. जर तीन लोकांनी मिळून १५ लाख रुपये गुंतवले, तर दरमहा ९,२५० रुपये परतावा मिळणं सुरू होईल. या हिशोबात तुम्हाला वर्षाला १.११ लाख रुपये मिळतील. ५ वर्षांनंतर तुम्ही तुमची मूळ १५ लाख रुपयांची रक्कम परत काढू शकता.
योजनेची खास वैशिष्ट्यं
मंथली इनकम स्कीममध्ये गुंतवणूकदाराला १ वर्षानंतरच पैसे काढण्याचा पर्याय मिळतो. तुम्हाला हवं असल्यास ५ वर्षांनंतर पूर्ण रक्कम काढता येते. या योजनेत मिळणारं व्याज दरमहा आपोआप गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस खात्यात जमा केलं जातं. या योजनेत परतावा जरी खूप जास्त नसला, तरी गुंतवणुकीला पूर्ण सुरक्षा मिळते.
