जगभरातील कॉर्पोरेट क्षेत्रातील वेतन विषमतेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनल (OI) आणि इंटरनॅशनल ट्रेड युनियन कॉन्फडरेशन (ITUC) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, २०२५ मध्ये जागतिक स्तरावर टॉप CEO यांच्या पगारात कर्मचाऱ्यांच्या तुलनेत तब्बल २० पट वेगाने वाढ झाली आहे.
CEO VS कर्मचारी...
अहवालानुसार, २०२५ मध्ये CEO च्या पगारात महागाई समायोजित केल्यानंतर वास्तविक ११ टक्क्यांची वाढ झाली. याउलट, सामान्य कर्मचाऱ्यांच्या पगारात केवळ ०.५ टक्क्यांचीच वाढ झाली आहे. या विश्लेषणात ३३ देशांतील १,५०० मोठ्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.
सरासरी पगार किती?
अहवालानुसार, CEO चा सरासरी पगार २०२४ मधील ७.६ दशलक्ष डॉलरवरून २०२५ मध्ये ८.४ दशलक्ष डॉलरपर्यंत (सुमारे ७० कोटी रुपये) वाढला आहे.
२०१९ ते २०२५: कर्मचाऱ्यांचे नुकसान, CEO ना फायदा
२०१९ ते २०२५ या कालावधीत वाढत्या महागाईमुळे जगभरातील कर्मचाऱ्यांचे वास्तविक वेतन १२ टक्क्यांनी घटले आहे. ही घसरण म्हणजे कर्मचाऱ्यांनी जवळपास १०८ दिवस विनामूल्य काम केल्यासारखी आहे. याउलट, याच काळात CEO च्या एकूण मोबदल्यात ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
अब्जाधीशांची कमाई
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, २०२५ मध्ये अब्जाधीशांनी त्यांच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या डिव्हिडंडच्या माध्यमातून दर सेकंदाला सुमारे २,५०० डॉलरची कमाई केली.
अमेरिकेत सर्वाधिक तफावत
वेतनातील सर्वाधिक दरी अमेरिकेत आढळून आली. S&P 500 कंपन्यांच्या CEO च्या पगारात २०२४ ते २०२५ दरम्यान २५.६ टक्क्यांची वाढ झाली. याउलट, त्याच कालावधीत अमेरिकेतील खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तासिक वेतनात केवळ १.३ टक्क्यांचीच वाढ झाली आहे.
सरकारांना काय सल्ला?
या अहवालाच्या आधारे ऑक्सफॅम आणि ITUC यांनी सरकारांना आवाहन केले आहे की, आर्थिक विषमता कमी करण्यासाठी CEO च्या पगारावर मर्यादा आणावी आणि श्रीमंतांवर न्याय्य कर प्रणाली लागू करावी.
