Petrol-Diesel: देशातील पेट्रोलचा वाढता वापर आणि परदेशी कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. 'E20' पेट्रोलच्या प्रयोगानंतर, सरकारने आता 'E30' इंधनाच्या दिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने E22, E25, E27 आणि E30 यांसारख्या उच्च इथेनॉल मिश्रीत पेट्रोलच्या नवीन मानकांना मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आगामी काळात देशात अधिक इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय आहे 'E30' पेट्रोल?
'E30' पेट्रोल म्हणजे असे इंधन, ज्यामध्ये ३०% एथेनॉल आणि ७०% पारंपारिक पेट्रोल मिक्स केलेले असेल. एथेनॉल हे एक जैविक इंधन असून ते प्रामुख्याने ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून तयार केले जाते. यामुळे पेट्रोलवरील देशाचा खर्च कमी होईल आणि थेट शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फायदा मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.
BIS कडून नवीन मानके जारी
भारतीय मानक ब्युरोने (BIS) १५ मे २०२६ रोजी या संदर्भातील नवीन इंधन मानके जाहीर केली आहेत. याअंतर्गत E22, E25, E27 आणि E30 इंधनासाठी वेगवेगळे तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले आहेत. हे सर्व इंधन पेट्रोल इंजिन असलेल्या वाहनांसाठी वापरले जाणार आहेत.
का घेण्यात आला हा निर्णय?
परदेशी तेलावरील अवलंबित्व: भारत आपल्या गरजेच्या ८५% पेक्षा जास्त कच्चा तेल परदेशातून आयात करतो.
अर्थव्यवस्थेवरील ताण: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की, त्याचा थेट फटका भारताची अर्थव्यवस्था आणि सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो.
पर्यावरण आणि शेतीला फायदा: इथेनॉलच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच देशातील शेती क्षेत्राला मोठी चालना मिळेल.
E20 नंतर आता पुढचे पाऊल
सरकारने यापूर्वीच देशात E20 (२०% एथेनॉल मिश्रित) पेट्रोल लॉन्च केले असून, देशातील अनेक भागांत त्याचा पुरवठा सुरू झाला आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांनीही E20 इंधनावर चालणारी वाहने बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आता सरकारने जारी केलेल्या नवीन मानकांवरून हे स्पष्ट होत आहे की, सरकार केवळ E30 वरच थांबणार नाही, तर भविष्यात 'E85' सारख्या उच्च एथेनॉल इंधनावरही काम करत आहे.
तुमची गाडी E30 पेट्रोलवर चालणार का?
सध्या सरकारने E30 पेट्रोलच्या लाँचिंगची कोणतीही निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. यासाठी वाहन उत्पादक कंपन्या, इंधन पुरवठा यंत्रणा आणि पेट्रोल पंप नेटवर्क सज्ज केले जात आहे. आगामी काळात येणारी नवीन वाहने ही या उच्च इथेनॉल इंधनाच्या तंत्रज्ञानानुसारच डिझाईन केली जातील, असे मानले जात आहे. त्यामुळे जुन्या गाड्यांमध्ये हे इंधन वापरण्यापूर्वी इंजिनमध्ये काही तांत्रिक बदल करावे लागू शकतात.
