भाजपच्या 'त्या' बारापैकी सहा उमेदवारांचे 'एबी' फॉर्म बाद; अपक्ष निवडणूक लढणार की माघार घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2026 14:38 IST2026-01-02T14:38:17+5:302026-01-02T14:38:46+5:30
Nagpur : महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील सहा जागांवर भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळेच सहा जागांवर एकूण बारा उमेदवारांना 'एबी' फॉर्म देण्यात आले.

'AB' form of six out of 'those' twelve BJP candidates rejected; Will they contest the election as independents or withdraw?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील सहा जागांवर भाजपला शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम उमेदवार निश्चित करता आला नाही. त्यामुळेच सहा जागांवर एकूण बारा उमेदवारांना 'एबी' फॉर्म देण्यात आले. छाननीदरम्यान त्यातील सहा उमेदवारांचा 'एबी' फॉर्म भाजपकडून लढण्यासाठी पात्र ठरला नाही. आता ते सहाही जण अपक्ष ठरणार आहेत. आता ते उमेदवार निवडणूक लढविणार की रिंगणातून माघार घेणार हे शुक्रवारी स्पष्ट होईल.
भाजपने १५१ पैकी १४३ जागांवर उमेदवार उतरविले आहेत, तर शिंदेसेनेच्या कोट्यातूनदेखील सहा उमेदवार भाजपचेच आहेत. हे उमेदवार निवडताना सर्वेक्षण अहवाल, मुलाखती इत्यादी बाबी लक्षात घेण्यात आल्या. परंतु, सहा जागांवर भाजपला अंतिम उमेदवारांचे नाव ठरविता आले नाही. त्यामुळे सहा जागांवर बाराजणांना 'एबी' फॉर्म देण्यात आले आहेत. त्यात प्रभाग १३ ब मधून ऋतिका मसराम व रूपाली राजेश वरठी, प्रभाग १३ ड मधून किसन गावंडे व विजय होले, प्रभाग १८ मधून सुधीर राऊत व धीरज चव्हाण, प्रभाग २२ ड मधून श्रीकांत आगलावे व सुबोध आचार्य, प्रभाग ३१ ड मधून मानसी शिमले व अंबिका महाडिक, तर प्रभाग ३८ ब मधून प्रतिभा राऊत व स्वप्ना हिरणवार यांचा समावेश होता. छाननीदरम्यान सहा जणांचे 'एबी' फॉर्म अपात्र ठरले. त्यात रूपाली वरठी, किसन गावंडे, धीरज चव्हाण, सुबोध आचार्य, अंबिका महाडिक व स्वप्ना हिरणवार यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या प्रभागांमधून ऋतिका मसराम, विजय होले, सुधीर राऊत, श्रीकांत आगलावे, मानसी शिमले व प्रतिभा राऊत हे भाजपचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पहिला अर्ज भरणाऱ्याला प्राधान्य
मंगळवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर दोन ठिकाणांवरील उमेदवारांनी तातडीने कायदेशीर बाबी तपासून घेतल्या व कागदपत्रे घेऊन संबंधित झोनच्या मनपा कार्यालयात जाऊन नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. पहिला अर्ज भरलेल्या उमेदवाराला पक्षाचा अधिकृत उमेदवार मानण्यात आले.
१२ उमेदवारांनी घेतली माघार
महापालिका निवडणुकीच्या लढतीतून गुरुवारी १२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवार (दि.२) पर्यंत आहे. त्यामुळे प्रभागातील लढतीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. पक्षाच्या बंडोबांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी मोठ्याप्रमाणात उमेदवारी मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.
यांनी या प्रभागातून घेतली माघार
रूपाली संदीप माने (३३-अ), भारती नितीन झाडे (२६- क), कल्पना गणेश सारवे (२६-क), शेख मुजिब शेख मोहम्मद (२७-ड), फरदीन गनी खान (१९- ड), अनिता रितेश काशीकर (२२-क), विक्रमसिंग बजरंगसिंग परिहार (५-ड), गणेश लीलाराम शाहू (२०-ड), अर्चना राकेश पाटील (२४-अ), अनिता प्रदीप वानखेडे (२४- अ), निसार अहमद कुरेशी (९- ड), अमित अशोक बंसोड (९- अ)