शिक्षकांना 'टीईटी' परीक्षा का ठरतेय डोकेदुखी? सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी अग्निपरीक्षा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:47 IST2025-09-08T18:46:05+5:302025-09-08T18:47:53+5:30

Bhandara : सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या निर्णयानुसार इयत्ता पाहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे बंधनकारक आहे. अन्यथा नोकरी सोडावी लागणार आहे.

Why is the 'TET' exam a headache for teachers? A test of strength for teachers on the verge of retirement! | शिक्षकांना 'टीईटी' परीक्षा का ठरतेय डोकेदुखी? सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी अग्निपरीक्षा !

Why is the 'TET' exam a headache for teachers? A test of strength for teachers on the verge of retirement!

भंडारा : सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबरच्या निर्णयानुसार इयत्ता पाहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे बंधनकारक आहे. अन्यथा नोकरी सोडावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांसाठी ही टीईटी एक अग्निपरीक्षा असून, शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा घाट असल्याची शिक्षकांची प्रतिक्रिया आहे.

यात पाच वर्षे सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना सूट मिळाली असून, पदोन्नतीसाठी टीईटी आवश्यक आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे मुलांना शिकवून त्यांच्या परीक्षा घेणाऱ्या वयाची पन्नाशी ओलांडलेल्या शिक्षकांनाही आता स्वतः अभ्यास करून परीक्षा पास करण्याचे आव्हान आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागे लागलेला परीक्षेचा ससेमिरा संपता संपेना, अशी शिक्षकांची दैनावस्था झाली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असून, शिक्षक संघटनांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीईटी पदवीशिवाय कोणीही शिक्षक होऊ शकत नाही. मग आतापर्यंत शिक्षक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या डी. एड., बी.एड., डी. एल. एड. किंवा इतर अनेक प्रशिक्षण अभ्यासक्रम पदव्यांचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. ही परीक्षा म्हणजे सक्तीची सेवानिवृत्ती अभियानाचा एक भाग आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी सांभाळून जनगणना, निवडणुका, नवसाक्षरता अभियान, शाळाबाह्य सर्वेक्षण, यु-डायस प्लस, शालेय पोषण आहार, आधार कार्ड, विविध समित्यांचे रेकॉर्ड, शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी १२०पेक्षा अधिक प्रकारच्या ऑनलाइन -ऑफलाइन रात्र - दिवस कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकाची परीक्षा घेणे हास्यास्पद आहे.

"तीस वर्षापूर्वी दुय्यम सेवा मंडळाची परीक्ष पास करणारे बहुतेक आता शिक्षक पन्नास ते पंचावन्न वयोगटातील आहेत. भरमसाठ अशैक्षणिक कामे सांभाळून निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. टीईटीच्या परीक्षेने अशा शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे म्हणजे जुन्या अनुभवी शिक्षकांना घरी बसविणे होय."
- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा

"शैक्षणिक, कौटुंबीक व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळून २५ ते ३० वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांची आता सेवानिवृत्तीच्या काळात परीक्षा घेणे योग्य नाही. यावर पुनर्विचाराची गरज आहे."
- कैलास चव्हाण, आदर्श शिक्षक पुरस्कार

"२५ ते ३० वर्षे सेवा करून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शिक्षकांना परीक्षा देण्यास भाग पाडणे म्हणजे शिक्षकांची थट्टाच होय. त्यामुळे परीक्षेची सक्ती नकोच."
- राजेश धुर्वे, जिल्हा कार्यवाह विमाशि

Web Title: Why is the 'TET' exam a headache for teachers? A test of strength for teachers on the verge of retirement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.