तुमसरचे एसडीओ आणि तहसीलदार निलंबित ! रेती तस्करीचे काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:18 IST2025-04-10T11:18:02+5:302025-04-10T11:18:46+5:30

Bhandara : रेती उत्खनन आणि साठेबाजीत सहभाग, महसूलमंत्र्यांनी काढले निलंबनाचे आदेश

Tumsar's SDO and Tehsildar suspended! What is the sand smuggling case? | तुमसरचे एसडीओ आणि तहसीलदार निलंबित ! रेती तस्करीचे काय आहे प्रकरण?

Tumsar's SDO and Tehsildar suspended! What is the sand smuggling case?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्यातील तुमसर उपविभागात अवैध वाळू उत्खनन रोखण्यास संपूर्णतः अपयशी ठरल्याचा व साठेबाजीत सहभागी असल्याचा ठपका ठेवत तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी हे आदेश काढले.


रेती तस्करांनी बावनथडी व वैनगंगा नदीचे पात्र नियमबाह्य पोखरले आहे. येथील रेती चोरी प्रकरण विधिमंडळ अधिवेशनातही गाजले होते रेती चोरी प्रकरणाला महसूल विभागातील अधिकारी कसे जबाबदार आहेत, याची माहिती आमदार नाना पटोले व आमदार जयंत पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहापुढे ठेवली होती.


अवैध रेती उत्खनन रोखण्याची व संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली होती. तसेच अवैध रेतीच्या डंपरच्या अपघातात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळण्याचीही मागणी केली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी सात दिवसांत विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. हा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर बावनकुळे यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. 


मुख्यमंत्र्यांनी घेतली होती व्हायरल पत्राची दखल
रेती तस्करी अवैध वाळू उत्खनन आणि साठेबाजीत सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांबाबत तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना पत्र लिहून येथील अवैध रेती उत्खननावरून अनेक गंभीर आरोप केले होते. सत्तापक्षातील या आमदारांचे ते पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर बरीच खळबळ माजली होती. त्याची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. दर्शन निकाळजे हे तुमसर उपविभागीय अधिकारी पदावर ३० ऑगस्ट २०२३ पासून रुजू झाले होते. गडचिरोली येथे परिविक्षाधिन कालावधी पार पाडल्यानंतरची त्यांची ही येथील पहिलीच पोस्टिंग होती. तर, तहसीलदार मोहन टिकले हे २ फेब्रुवारी २०२४ ला येथे रुजू झाले होते. 


फुके यांनीही दिले होते मुख्यमंत्र्यांना पत्र
राजू कारेमोरे यांच्या त्या पत्रानंतर विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनीही मुख्यमंत्र्यांना येथील अवैध रेती उत्खननाबद्दल पत्र दिले होते.
तस्करीत गुंतलेले दलाल, कार्यकर्ते व अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती.


काय आहे अहवालात?
विभागीय आयुक्तांनी दिलेल्या चौकशी अहवालात भंडारा जिल्ह्यातील तुमसर भागात पर्यावरण विभागाची अनुमती नसताना रेती घाटांमधून उत्खनन झाल्याचे नमूद आहे. हा प्रकार थांबविण्याची जबाबदारी असतानाही उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार प्रतिबंध घालू शकले नाही. त्यामुळे यात ते लिप्त असल्याचा ठपकाही अहवालात ठेवण्यात आहे. 


'लोकमत'ने केला होता पाठपुरावा
तुमसर तसेच भंडारा जिल्ह्यातील रेती घाटांवरून चालणाऱ्या अवैध रेती उत्खननाचे आणि तस्करीचे प्रकरण 'लोकमत'ने सातत्याने लावून धरले होते. मध्य प्रदेशातून होणाऱ्या तस्करीचा प्रकारही अनेक बातम्यांमधून उघडकीस आणला होता.


"अवैध वाळू उत्खनन व साठेबाजी हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सामान्य नागरिकांच्या हक्काच्या वाळूवर बेकायदेशीर डल्ला मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात जिथे कुठे होईल, तिथे हाणून पडला जाईल. राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गंभीरपणे लक्ष द्यावे."
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

Web Title: Tumsar's SDO and Tehsildar suspended! What is the sand smuggling case?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.