काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसाठी उघडले मंदिर, मग सर्वसामान्यांसाठी बंद का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:35 IST2021-09-06T08:33:57+5:302021-09-06T08:35:03+5:30
भंडाऱ्यातील घटना; माजी आमदाराला मात्र परत पाठविले

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसाठी उघडले मंदिर, मग सर्वसामान्यांसाठी बंद का?
गणेश देशमुख
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा जिल्ह्यातील चारभट्टी देवस्थानात शनिवारी महापूजेसाठी प्रवेश दिला असताना जिल्ह्यातील चांदपूर देवस्थानात महाआरतीसाठी आलेले भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांना मात्र मंदिर प्रवेशबंदीचा नियम सांगून पायऱ्यांवरच रोखण्यात आले.
पटोलेंसोबत भाविक-कार्यकर्तेही होते. पटोले यांना गाभाऱ्यात महापूजेसाठी प्रवेश देण्यात आला. वाघमारे मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आले होते. त्यांना बजरंगबलीची आरती करायची होती. भाविकांना पोलिसांनी पायऱ्यांवरच रोखून धरले. याबाबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांना वारंवार संपर्क करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.
मंदिरे खुली करण्याची आमची मागणीच आहे. आघाडी सरकार त्यांच्या नेत्यांसाठी कायदे गैरलागू करतात. मंदिरेही उघडतात. यापूर्वी भास्कर जाधवांच्या मुलाचा अभिषेक झाला. आता नाना पटोलेंनी महापूजा केली. मग सर्वसामान्यांसाठीच मंदिरे बंद का?
- चरण वाघमारे, माजी आमदार, भाजप
चरण वाघमारे यांच्या महाआरतीबाबत मोबाइलवर मेसेज वितरित झाल्याने आम्हाला माहिती झाले. त्यांचा चांदपूर मंदिर प्रवेश आम्ही रोखला. नाना पटोले यांच्या चारभट्टीच्या महापूजेबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. मंदिर प्रवेशबंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाचा आहे. त्यांना विचारता येईल.
- वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा