टाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 17:26 IST2023-03-23T17:25:19+5:302023-03-23T17:26:07+5:30
नशीब बलवत्तर म्हणून हातावर निभावले

टाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना
तुमसर (भंडारा) : टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीत तुमसर रोड रेल्वे स्थानकातून चढताना प्रवाशाचा तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वे ट्रॅकमध्ये आले नाहीत. ही घटना बुधवारी सकाळी १०:३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडली. रमेश श्रीवास (५२, सुभाष वॉर्ड, तुमसर रोड) असे या प्रवाशाचे नाव आहे.
रमेश श्रीवास हे टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीने भंडारा रोड येथे जाण्यासाठी तुमसर रोड स्थानकात टाटा पॅसेंजर गाडीत बसताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे खाली पडले. सुदैवाने ते रेल्वे ट्रॅकच्या खाली आले नाहीत म्हणून थोडक्यात बचावले. दरम्यान, त्यांच्या उजव्या हाताला व शरीराला गंभीर जखमा झाल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे इन्चार्ज मोसेसुद्दिन यांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना स्थानिक रेल्वे रुग्णालयात दाखल केले. तिथे प्रथमोपचार करून तुमसर येथे उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता नेण्यात आले.