अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धान जमा करू ; राज्य किसान सभेकडून धान मोजणीसाठी अल्टीमेटम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:10 IST2025-07-21T17:09:05+5:302025-07-21T17:10:35+5:30
Bhandara : शेतकऱ्यांच्या धानाचे मोजमाप न केल्यास ३१ जुलैनंतर धान भंडाऱ्याला आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा करण्यात येईल

Otherwise, we will deposit paddy in front of the District Collector's Office; Ultimatum for counting paddy from the State Kisan Sabha
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून शेतकऱ्यांच्या धानाचे मोजमाप करावे. असे न केल्यास ३१ जुलैनंतर केंद्रावरील शिल्लक असलेले धान भंडाऱ्याला आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष माधवराव बांते यांनी दिला आहे.
पणन विभागाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब झाला. शेतकऱ्यांना आपला धान अत्यल्प भावात खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागला. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीची अट व वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अधिकांश शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत. रब्बी हंगाम २०२४-२५ मध्ये पणन विभागाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर झाला. बऱ्याच शेतकऱ्यांना धान हा कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना विकावा लागला. त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.
नोंदणीकृत शेतकऱ्यांचे धान ज्या खरेदी केंद्रावर विक्रीसाठी ठेवलेले आहेत, त्या धानाचे ३१ जुलैपर्यंत मोजमाप व्हावे. अन्यथा सर्व धान खरेदी केंद्रावरील शिल्लक असलेले धान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा करण्याचा अल्टीमेटम दिला आहे.
ही तर शेतकऱ्यांची अडवणूकच
शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीची अट होती. तांत्रिक अडचणीमुळे बरेच शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले. ज्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली, त्यांनी विक्रीकरिता धान खरेदी केंद्रावर आणून ठेवला आहे. मात्र, त्यांच्याही धानाचे मोजमाप झालेले नाही. धान खरेदीचे उद्दिष्ट कमी असल्याने धान खरेदी करता येणार नाही, असे केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे. ही शेतकऱ्यांची अडवणूक असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेने केला आहे.