ना चिठ्ठी मिळाली, ना यादीत नाव होते; मतदार शोधत राहिले याद्या! भंडाऱ्यात नागरिक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 02:14 PM2024-04-19T14:14:53+5:302024-04-19T14:18:11+5:30

प्रशासनाच्या गाफिलीमुळे अनेक मतदारांना फटका बसला असून त्यांच्यात असंतोष उफाळून आला

No note was received no name was on the list Voters are looking for lists Citizens were angry in Bhandara | ना चिठ्ठी मिळाली, ना यादीत नाव होते; मतदार शोधत राहिले याद्या! भंडाऱ्यात नागरिक संतापले

ना चिठ्ठी मिळाली, ना यादीत नाव होते; मतदार शोधत राहिले याद्या! भंडाऱ्यात नागरिक संतापले

देवानंद नंदेश्वर, भंडारा : लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले असले तरी मतदार नोंदणी केल्यानंतरही अनेक मतदारांची नावेच मतदार यादीतून बेपत्ता झाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. प्रशासनाच्या या गाफिलीमुळे अनेक मतदारांना फटका बसला असून त्यांच्यात असंतोष उफाळून आला आहे.

१८ वर्षावरील सर्व नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी निवडणुक विभागाने विशेष मोहिम राबवून मतदारांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला होता. त्यानुसार, अनेक नव मतदार तसेच ज्यांची नावे मतदार यादीतून गहाळ झाली त्यांनी नव्याने आपल्या नावाची नोंदणी केली. परंतु, शुक्रवारी मतदान केंद्रावर गेलेल्या अनेक मतदारांना वेगळाच अनुभव आला. मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना यादीमध्ये नावे शोधूनही सापडली नाही. याबाबत संबंधित केंद्रावरील अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता अन्य केंद्रावर जाण्याचा सल्ला देण्यात आला. या मतदारांनी अन्य केंद्रावर जाऊन तपासणी केली असता त्याठिकाणीही त्यांची नावे यादीमध्ये आढळून आली नाही. मतदान करण्यासाठी शुक्रवारी मतदार मोठ्या उत्साहात मतदान केंद्रावर पोहोचले. एकानंतर दुसरे, नंतर तिसरे यासह अन्य केंद्रावर जाऊन तपासणी केली. परंतु, नावे आढळून आली नाही. ‘लोकमत’ने शहरातील अनेक मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली असता अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याचे आढळून आले. मतदान केंद्रावर मतदार आपली नावे शोधण्यात मग्न होते तर काही मतदार निराश होऊन आल्यापावली परत जात होते. या मतदारांनी आपले ओळखपत्र, निवडणूक ओळखपत्र आदी दस्तावेज दाखवूनही त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. १८ वर्ष पुर्ण केलेल्या तरूण मतदारांची नावे फॉर्म -६ भरल्यानंतरही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करण्यात आली नसल्याचे संतापलेल्या मतदारांनी सांगितले. हा प्रकार नव मतदारांसोबत घडला नसून वर्षानुवर्षांपासून मतदान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबतही घडला आहे.

Web Title: No note was received no name was on the list Voters are looking for lists Citizens were angry in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.