रेतीचा ओव्हरलोडेड ट्रक उलटला; १३ तास विद्युत पुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 15:25 IST2023-10-19T15:24:22+5:302023-10-19T15:25:43+5:30
नागरिकांना नाहक मनस्ताप

रेतीचा ओव्हरलोडेड ट्रक उलटला; १३ तास विद्युत पुरवठा खंडित
जांब (लोहारा) : रेतीने भरलेला ट्रक भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी धानाच्या शेतात उलटला. याचवेळी तिथे असलेल्या विद्युत खांब तुटल्याने १३ तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे गाव व परिसरातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ही घटना पहाटे ४ च्या सुमारास घडली.
माहितीनुसार, जांब ते लोहारा मार्गावर पहाटेच्या सुमारास रेतीने भरलेला एमएच ४० बीजी ९८२२ हा ट्रक जात होता. याचवेळी ट्रकचालकाचा वाहनावरून नियंत्रण सुटले. हा ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन उलटला. शेतात विद्युत खांबालाही या ट्रकची धडक लागली. त्यामुळे विद्युत पुरवठा करणारे दोन खांब अक्षरशः तुटून पडले.
विद्युत तारा तुटल्याने परिसरात गावांची विद्युत पुरवठा खंडित झाला. यात जांब, लोहारा, धोप, कांद्री या गावांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळतात विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी तसेच पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, १३ तास विद्युत पुरवठा खंडित झालेल्या गावातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.