कारागृहातून सुटलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 18:13 IST2023-06-29T18:10:35+5:302023-06-29T18:13:35+5:30
लाखांदूर पोलिसांनी तत्परतेने पोहचून आरोपी युवकाला घेतले ताब्यात

कारागृहातून सुटलेल्या आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : मागील चार वर्षांपूर्वी एका महिलेच्या अत्याचार व खून प्रकरणी शिक्षा भोगून कारागृहातून सुटलेल्या आरोपीने एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना २९ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तालुक्यात घडली आहे. या घटनेत पीडित अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरून राजेश उर्फ राजू व्यंकट शहारे (३०) नामक आरोपी युवकाविरोधात विनयभंगाच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, घटनेतील आरोपी युवकाने मागील ४ वर्षांपूर्वी स्थानिक परीसरातील एका महिलेवर अत्याचार करून खून केला होता. याप्रकरणी आरोपीने काही वर्ष कारावास देखील भोगला होता. तथापि, या घटनेत शिक्षा भोगून गत काही दिवसांपूर्वी कारागृहातून सुटलेल्या आरोपी युवकाने सकाळी अल्पवयीन बालकेला गावालगतच्या शेतशिवारात एकटी पाहून विनयभंग केला. घाबरलेल्या बालिकेने आरडाओरड केली असता शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपीने पळ काढून घरात दडी मारली.
पोलीस उपनिरीक्षक अनिल मांदाडे, पोलीस हवालदार डोलीराम भोयर, पोलीस अंमलदार राहुल गायधने, भूपेंद्र बावनकुळे आदी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून युवकाला ताब्यात घेतले. या घटनेत पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने संतापलेल्या नागरिकांच्या तावडीतून आरोपी बचावल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरविंदकुमार जगणे करीत आहेत.