५२९ कोंबड्यांच्या उष्णतेमुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 15:22 IST2024-06-28T15:22:06+5:302024-06-28T15:22:38+5:30
सोनपुरी येथील घटना : दीड लाखांचे नुकसान

529 heat deaths of chickens
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायांतर्गत उभारलेल्या पोल्ट्री फार्ममधील तब्बल ५२९ कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. यामुळे सोनपुरी येथील शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारला उघडकीला आली.
दरम्यान, सलग सहा तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करीत नुकसानभरपाई मागितली आहे. पोल्ट्री फार्मसाठी कठाणे यांनी वीजपुरवठ्यासंदर्भात विद्युत रोहित्रासाठी दोन लाख भरले होते. बुधवार, दि.२६ जूनला सकाळी ८ वाजता अचानक वीजपुरवठा खंडित झाला. कठाणे यांनी एकोडी महावितरण अभियंत्यांना फोन केला. येथे २४ तास वीजपुरवठा संलग्न केला आहे व उष्णतेने पक्ष्यांची दयनीय अवस्था होत ते मृत्यू पावत आहेत. वीज गेल्यानंतर पोल्ट्री फार्मवरील कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचविण्यासाठी त्यांना थंड पाण्यात टाकून काढणे, ही क्रिया करीत कोंबड्या वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले; पण ते प्रयत्न विफल ठरले. यानंतर फोनवरच महावितरण अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वीज सुरू होणार नाही, असे शेतकऱ्यास सांगितले.
६ तासांपेक्षा जास्त काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने उष्णतेमुळे बुधवारला ४७२, तर गुरुवारला पहाटे ५७ कोंबड्यांचा मृत्यू झाला. दोन लाख रुपये भरून ट्रान्सफॉर्मर बसविले, जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायाला २४ तास वीज अबाधित उपलब्ध राहील; पण महावितरणच्या दिरंगाईमुळे पाचशेच्यावर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे एकूण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर नुकसानभरपाईची मागणी शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणकडे केली आहे. यापुर्वीही लाखनी तालुक्यात उष्णतेमुळे कोंबड्या दगावल्या होत्या.
"गत १० वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहे. यासाठी मी १२ लाख रुपयांचे कर्ज घेतले. मला नेहमीच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित होणे, या समस्येला लागते. महावितरणच्या तोंड द्यावे निष्काळजीपणाने माझे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने हे नुकसान तातडीने भरून द्यावे."
- गिरीश कठाणे, पोल्ट्री फार्मचालक, सोनपुरी