Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:29 IST2025-08-29T12:28:28+5:302025-08-29T12:29:09+5:30
Ganesh Chaturthi 2025: असे म्हणतात, की ज्याचा भाव शुद्ध असतो आणि देवावर ज्याची अढळ श्रद्धा असते त्याला देवकृपेचा अनुभव येतोच; कसा ते पहा!

Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
सध्या पावसाळा ऋतू सुरु असूनही काही गावं अशी होती जिथे दुष्काळजन्य परिस्थिती होती. पाणी नसल्याने गावकरी त्रासले होते. एकाने नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या मंदिरात जाऊन यज्ञ करा असे सांगितले.
गावातली एक व्यक्ती त्या मंदिरातल्या पुरोहितांना जाऊन भेटली, त्यांनी सांगितलं, आसपासच्या दुष्काळग्रस्त गावातील प्रत्येकी एक व्यक्ती प्रतिनिधी म्हणून ११ जणांना घेऊन या. त्या व्यक्तीने आजूबाजूच्या छोट्या छोट्या गावातील आणखी १० मंडळींना गोळा केले आणि ते ११ जण यज्ञ करण्यासाठी गणपतीच्या मंदिरात गेले.
पुरोहितांनी मनोभावे यज्ञ केला. सर्वांच्या हातून आहुती देऊ केली आणि सगळे काही पार पडल्यावर त्या मुख्य यजमानाला म्हणाले, 'दादा, तुमचे गाव वगळता, अन्य १० गावात पाऊस पडेल असे वाटत नाही. तुम्ही सर्वांनी मिळून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचली, पण फळ केवळ तुमच्याच गावाला मिळेल असे लक्षण दिसत आहे.'
१० जणांना घेऊन येणारी ती व्यक्ती पुरोहितांना म्हणाली, कशावरून तुम्ही असे म्हणता? देव बाकीच्या गावकऱ्यांवर रुष्ट आहे का?
पुरोहीत म्हणाले, 'देव कोणावरही रुष्ट होत नाही, फक्त तो प्रत्येकाच्या मनताला भाव पाहतो आणि तसा अनुभव देतो. या सगळ्यांच्या तुलनेत तुम्ही एकमेव असे आहात ज्यांची देवावर असीम श्रद्धा आहे. त्याची खूण म्हणजे तुम्ही सोबत आणलेली छत्री! तुम्हाला विश्वास आहे, की आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचणार आणि देव आपल्यावर कृपावृष्टी करणार, या खात्रीने तुम्ही सोबत छत्री घेऊन आलात, बाकीचे मात्र केवळ हा ही प्रयत्न करून पाहू या भावनेने आले.'
आणि खरोखरंच, बाकी १० गावांवर वृष्टी झाली नाही ती छत्री घेऊन आलेल्या माणसाच्या गावावर झाली. म्हणूनच म्हणतात, 'जया जैसा भाव, तया तैसा अनुभव!"
गणेश उत्सवाच्या(Ganesh Festival 2025) निमित्ताने आपणही यथाशक्ती बाप्पाची सेवा करत आहोत. ती सेवा मनोभावे करावी, काय सांगावं, देव आपल्यावरही कृपावंत होईल. यासाठीच आपण आपले कर्म करायचे आणि बाकी भार देवावर सोपवून निश्चिन्त व्हायचे, त्याच्यावर अढळ श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य सहज साध्य होईल, हे लक्षात ठेवा!