अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 10:12 IST2025-09-05T10:10:48+5:302025-09-05T10:12:17+5:30

Anant Chaturdashi 2025 Ganpati Visarjan Uttar Puja Vidhi, Mantra: गणपती बाप्पा विसर्जन उत्तर पूजा करताना एक मंत्र महत्त्वाचा मानला जातो. तो म्हणायलाच हवा, असे सांगितले जाते.

anant chaturdashi 2025 date shubh muhurat and know about ganpati bappa uttar puja visarjan vidhi and important mantra in marathi | अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी

अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी

Anant Chaturdashi 2025 Ganpati Uttar Puja Vidhi: पाहता पाहता अनंत चतुर्दशी आली. सार्वजनिक आणि हजारो घरचे गणपती बाप्पांना या दिवशी निरोप दिला जातो. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणपतीचे विसर्जन करताना घरातील वातावरण अगदी भावपूर्ण झालेले असते. गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो. यंदाच्या २०२५ च्या अनंत चतुर्दशीला काही विशेष योग जुळून येत आहेत. गणपती उत्तरपूजा करण्यासाठी कोणी मिळाले नाही, तर घरीच विसर्जन पूजा करता येऊ शकते, नेमकी अशी करावी गणपती उत्तर पूजा? जाणून घ्या, संपूर्ण पूजाविधी...

दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा किंवा अगदी दहा दिवसाचा गणपती असला, तरी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त विनवणी केली जाते. यंदा, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. शुक्रवार, ०५ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०३ वाजून १२ मिनिटांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीची सुरुवात होत आहे. तर, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ४१ मिनिटांनी अनंत चतुर्दशी समाप्त होईल. परंतु, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे.

मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!

पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, असे सांगितले जाते.

अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन उत्तर पूजा विधी (Ganpati Uttar Puja Vidhi) 

- सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचार पूजा करावी.

- गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा.

- गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत.

- एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यावेत. या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात.

- विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जयजयकार करावा.

- गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी.

- गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात.

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर सुरू करा 'ही' उपासना, ६ महिन्यात मिळेल फळ!

अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन उत्तर पूजा मंत्र (Ganpati Uttar Puja Mantra) 

यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।

गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते. त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी. मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी. यावेळी काही ठिकाणी गणपतीच्या हातावर दही, लाह्या देण्याची परंपरा आहे. आपापले कुळधर्म, परंपरा, रिती, कुळाचाराप्रमाणे गणपती बाप्पाला निरोप द्यावा, असे म्हटले जाते. 

२०२६ मध्ये गणपती बाप्पाचे आगमन कधी?

पुढच्या वर्षी बाप्पांचे आगमन १८ दिवस उशिराने होणार आहे. कारण पुढील वर्षी ज्येष्ठ अधिकमास आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी ही १४ सप्टेंबर २०२६ रोजी असेल.

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...!!!

 

Web Title: anant chaturdashi 2025 date shubh muhurat and know about ganpati bappa uttar puja visarjan vidhi and important mantra in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.