चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणाधीशच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:36 AM2020-08-22T00:36:55+5:302020-08-22T01:12:38+5:30

जनजागृती करताना अनेक व्याख्याने, स्फूर्तिदायक गीते सादर केली जात असत. हे एक सर्वांना एकत्रित आणण्याचे साधन होते.

Adhipati Ganadhish | चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणाधीशच

चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणाधीशच

googlenewsNext

- स्नेहलता देशमुख
हिंदू संस्कृतीत प्रत्येक कार्याची सुरुवात गणेशाला वंदन करून होते. ‘सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्ता, विद्येचा दाता, शान्तिकर्ता, वैभवदाता, बुद्धिप्रदाता’ सर्वकाही श्रीगणेशच आहे. चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपती गणाधीशच आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. गिरगावात केशवजी नाईकांच्या चाळीत गणपतीची प्रतिष्ठापना केली. जनजागृती करताना अनेक व्याख्याने, स्फूर्तिदायक गीते सादर केली जात असत. हे एक सर्वांना एकत्रित आणण्याचे साधन होते. मुंबईच्या प्रभादेवी मंदिरात, तसेच पुण्यातल्या सारसबाग व दगडूशेठ हलवाई येथेही दर्शनासाठी लांबच लांब रांग लागते. यातले असंख्य भक्त अथर्वशीर्षाचे पठण करतात. आपले दीनवाणे जीवन पारमार्थिकदृष्ट्या समृद्ध व तेजोमय करण्याचा उपासकाचा दिव्य मार्ग हाच आहे. या पठणाने चित्त शुद्ध होते व परमार्थाच्या वाटचालीसाठी सामर्थ्य लाभते. ॐकार हे गणेशाचेच रूप आहे. उपनिषदांत गणेशाचा गौरव गायला आहे. महाभारताचा लेखक श्रीगणेशच आहे. व्यासांनी महाभारताची रचना केली; पण ते लिहिले श्रीगणेशांनी. कारण श्रीगणेश दोन्ही हातांनी लिहीत होते. व्यासांनी लिखाणाची जबाबदारी स्वीकारावी म्हणून गणेशांना साद घातली. गणेशांनी संमती दिली; पण अट घातली, सांगताना कुठेही खंड पडता कामा नये. गंगेचा ओघ असतो तसे तुमचे सांगणे हवे. व्यासांनीही अट घातली, प्रत्येक अक्षर समजून घ्यायचे व मगच लिहायचे. गणेशांनी अट मान्य केली. आज संगणकाचे कर्तृत्व आपण मान्य करतो; पण गणपती व संगणक हे एकच कसे पाहा. संगणक दोन्ही हातांनी की बोर्ड सांभाळता. सर्व माहिती गोळा करतो व सादर करतो. गणपतीचे वाहन मूषक आहे तसेच संगणक माऊसवर चालतो. म्हणून संगणक युगात गणेशाचे महत्त्व कमी होत नाही. शल्यशास्त्रज्ञांचे तर गणेश दैवतच आहे. तंत्रज्ञानाने आपण गुडघे, हाड, सांध्यांचे प्रत्यारोपण करतो; पण गणपतीला हत्तीचे शीर बसविले ते मात्र मानवाला जमले नाही. असा हा गजमुख सर्वमान्य आहे.

Web Title: Adhipati Ganadhish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.