धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 20:28 IST2025-01-05T20:27:43+5:302025-01-05T20:28:09+5:30
मुंडे समर्थकांचे परळी पोलीस स्टेशनमध्ये पाच तास ठिय्या.

धनंजय मुंडेंविरोधात वक्तव्य; मनोज जरांगे यांच्या विरोधात परळीत अदखलपात्र गुन्हा दाखल
परळी: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी(दि.4) परभणी येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी आज(दि.5) परळी शहर पोलीस ठाण्यात तुकाराम बाबुराव आघाव यांनी तक्रार दाखल केली आहे.
आघाव यांच्या तक्रारीवरुन मनोज जरांगेंविरोधात भारतीय न्याय संहिता 2023, सेक्शन 356 (2) प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाच तास कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
मुंडे समर्थकांनी सांगितले की, परभणी येथील मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी व समाजाविषयी 'फिरू देणार नाही, घरात घुसून मारू' अशाप्रकारचे वक्तव्य केले. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे भडकाऊ वक्तव्य केले गेले. या वक्तव्याचा निषेध करत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मुंडे समर्थकांनी रविवारी परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला होता. रविवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले, ते सायंकाळ 6 पर्यंत सुरू होते. यावेळी मनोज जरांगे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. अखेर सायंकाळी जरांगे पाटलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आंदोलकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.