संतोष देशमुख हत्या प्रकरण; फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याचा मेसेज खोटा
By सोमनाथ खताळ | Updated: December 29, 2024 17:47 IST2024-12-29T17:46:34+5:302024-12-29T17:47:47+5:30
पाठविणाऱ्याचे नाव, गाव सगळंच बीड पोलिसांनी लपवलं

संतोष देशमुख हत्या प्रकरण; फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याचा मेसेज खोटा
सोमनाथ खताळ
बीड : मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील फरार तीन आरोपींचे मृतदेह सापडल्याचा व्हाईस मेसेज अज्ञात व्यक्तीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पाठविला होता. त्याची माध्यमांनाही माहिती दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर बीडपोलिसांची याचा तपास केला असता, संबंधिताने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तर दमानिया यांनाही यासंदर्भात बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, पोलिसांनी मेसेज पाठविणाऱ्याचे नाव, तो कुठला आहे किंवा कारवाई काय केली, याची माहिती न दिल्याने संशय व्यक्त होत आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींच्या अटकेसाठी शनिवारी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील बीडमध्ये आल्या होत्या. त्यांनी आपल्या मोबाईलवर एका व्यक्तीने व्हाईस मेसेज पाठवून या प्रकरणातील तीनही आरोपींचे मृतदेह बश्वेश्वर कल्याणला सापडल्या आहेत, अशी माहिती दिली होती. ही माहिती त्यांनी बीड पोलिसांना दिली. त्यानंतर याचा शोध पोलिसांनी घेतला असता दारूच्या नशेत एका व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तर दमानिया यांनाही याबाबत नोटिस देण्यात आली.
पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात
राज्यभरात गाजलेल्या या गंभीर प्रकरणात दमानिया यांनी मृतदेह सापडल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर रविवारी पोलिसांनी यातील संबंधित व्यक्तीचा शोध घेतल्याचे सांगितले. परंतू तो व्यक्ती कोण आहे? त्याच्यावर काय कारवाई केली? त्याने हे कृत्य का केले? दमानिया यांनाच का व्हाईस मेसेज पाठवला? यासारख्या कोणत्याच प्रश्नाचा खुलासा पोलिसांनी केला नाही. त्यामुळे ही कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात आहे. नाव नाही, किमान तो व्यक्ती कुठला आहे? याचीही माहिती बीड पोलिसांनी दिली नाही. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना संपर्क केला, परंतू त्यांनी फोन घेतला नाही.
कारवाई झाली आहे. तो व्यक्ती कोण? त्याचे नाव काय ? हे तुम्हाला देता येत नाही.- उस्मान शेख, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड
पोलिस आणि क्राईमला एकमेकांचा ताळमेळ नसेल. कारण मला जी माहिती होती ती एसपींना दिली होती. मला जे पत्र आले आहे ते क्राईम ब्रांचकडून आले आहे. क्राईम ब्रांच काय आणि सीआयडी काय, ज्यांना माहिती हवी, त्यांना द्यायला तयार आहे. मुख्य मुद्दा हा आहे की ते झाले की नाही, हे शोधणे पोलिसांचे काम आहे. यासंदर्भात मी पोलिस अधीक्षकांना मेसेज पाठवला आहे. त्यांचा वेळ मिळाला की भेट घेणार आहे.- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या