करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:45 IST2021-09-06T08:44:15+5:302021-09-06T08:45:14+5:30
ॲट्रॉसिटी, खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, एकच खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी (जि. बीड) : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांचा रविवारचा परळी दौरा वादग्रस्त ठरला. त्यांनी शहरात प्रवेश करताच मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी करुन त्यांना घेराव घातला. दरम्यान, त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली. सायंकाळी करुणा शर्मांवर ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला.
रविवारी परळीत दाखल होताच करुणा शर्मा यांनी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाटेतच त्यांची जीप अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. शर्मा व मुंडे समर्थक महिलांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. शर्मा यांना त्यांच्या गाडीत बसवून शहर ठाण्यात नेण्यात आले. त्यांच्या गाडीच्या झडतीत डिकीत पिस्तूल आढळले. ते पोलिसांनी जप्त केले आहे. शर्मा यांच्या गाडीच्या चालकाचीही चौकशी केली.
याचदरम्यान विशाखा घाडगे यांनी शर्मा व अरुण मोरे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार, वैद्यनाथ मंदिरासमोर घाडगे यांना जातिवाचक शिवीगाळ का करता, असे विचारल्याने शर्मा यांनी बेबी तांबोळी यांना ओढून खाली पाडले तर अरुण मोरे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने पाेटावर चाकूने वार केला. जखमी तांबोळींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाडगे यांच्या तक्रारीवरुन ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांन्वये गुन्हा नोंद झाला. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गाडीत पिस्तूल ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल
करुणा शर्मा यांच्या चारचाकी गाडीतून पिस्तूल जप्त केले होते. मात्र, त्यानंतर काही वेळाने वैद्यनाथ मंदिराजवळून त्यांची गाडी मार्गस्थ होताना मागील डिकी उघडून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या एका महिलेने काहीतरी वस्तू गाडीत ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. गाडीत आढळलेले पिस्तूल त्या व्यक्तीनेच ठेवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.