पंकजा मुंडेंकडून मतदारसंघात आव्हान; सुरेश धसांनी लगावला खोचक टोला, परळीबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 08:12 IST2025-02-11T07:53:48+5:302025-02-11T08:12:29+5:30
बीड मतदारसंघ तर माझाच आहे, पण मला आता आष्टी मतदारसंघावर जास्त प्रेम करावं लागेल, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.

पंकजा मुंडेंकडून मतदारसंघात आव्हान; सुरेश धसांनी लगावला खोचक टोला, परळीबद्दल म्हणाले...
BJP Suresh Dhas: विधानसभा निवडणूक निकालापासून बीड जिल्ह्यातील भाजपच्या दोन नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. पंकजा मुंडेंनी यंदाच्या निवडणुकीत माझी मदत न करता अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना सहकार्य केल्याचा आरोप आमदार धस यांनी केला. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी मला आष्टी मतदारसंघावर अधिकचं प्रेम करावं लागेल, असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या सुरेश धस यांना आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर धस यांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांच्यावर पलटवार केला आहे.
"नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी आष्टी मतदारसंघावर खूप प्रेम केलं आहे. पंकजा मुंडे यांनी आता ज्या कार्यक्रमात वक्तव्य केलं तो व्हिडिओ सर्व मतदारसंघात दाखवा. कारण त्या कार्यक्रमाला कोण लोक होते? तिथं तर सर्व शिट्टी आणि घड्याळाचे लोक होते. पंकजा मुंडेंनी त्याच लोकांवर प्रेम करावं, भाजपच्या लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर प्रेम करायला मी सक्षम आहे," असा टोला सुरेश धस यांनी लगावला आहे.
आष्टीवर लक्ष देण्याचे संकेत देणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल करताना सुरेश धस पुढे म्हणाले की, "आष्टी भाजपचाच मतदारसंघ आहे, इथं तुम्ही जास्त लक्ष दिलं तरी आमची काही हरकत नाही. पण परळी हा तुमचा मूळ मतदारसंघ आहे, तिकडं जास्त लक्ष द्या. कारण तिकडं सगळंच हायजॅक करण्यात आलं आहे. निवडणुकीत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की फक्त केज हाच माझा मतदारसंघ आहे. मग आता आष्टी भाजपचा कसा मतदारसंघ झाला? त्या जे काही बोलतात त्यावर त्यांनी ठाम राहावं," अशा शब्दांत धस यांनी पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
आष्टीबद्दल पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
"बीड मतदारसंघ तर माझाच आहे, पण मला आता आष्टी मतदारसंघावर जास्त प्रेम करावं लागेल. कारण परळी मतदारसंघ तर राष्ट्रवादीला गेला आहे. आष्टी भाजपचा मतदारसंघ असल्यामुळे इथं मला जास्त ताकद उभी करावी लागेल. इथं कार्यक्रमाला यावं लागेल, चालेल ना?" असं विधान नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडे यांनी केलं होतं.