Beed: गेवराईत राष्ट्रवादी-भाजप गट आमनेसामने; भाजप नेत्याच्या घरासमोर तुफान दगडफेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:30 IST2025-12-02T14:30:35+5:302025-12-02T14:30:58+5:30
गेवराईत निवडणुकीतील राजकीय वैमनस्य आणि स्थानिक पातळीवरील तणाव शिगेला

Beed: गेवराईत राष्ट्रवादी-भाजप गट आमनेसामने; भाजप नेत्याच्या घरासमोर तुफान दगडफेक
गेवराई (बीड): बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतदानाच्या प्रक्रियेला आज सकाळी हिंसक वळण लागले. प्रभाग क्रमांक १० येथील मतदान केंद्रावर सुरू झालेला शाब्दिक वाद लवकरच टोकाला गेला आणि भाजपचे माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोरच तुफान दगडफेक करण्यात आली. दोन्ही गटांकडून झालेल्या या हल्ल्यात अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्याने शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
पंडित विरुद्ध पवार गट आमनेसामने
गेवराई नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा पंडित गट आणि भाजपचा पवार गट यांच्यात चुरस आहे. मतदानाच्या वेळेस या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी शाब्दिक चकमक झाली. हा तणाव वाढून थेट माजी आमदार लक्ष्मणराव पवार यांच्या घरासमोर पोहोचला. दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार दगडफेक आणि हल्ला चढवण्यात आला. याच दरम्यान राष्ट्रवादीच्या विजयसिंह पंडित गटाचे कार्यकर्ते भाजपचे माजी आमदार पवार यांच्या घरासमोर जमले. यामुळे तणावामध्ये अधिक भर पडली. यावेळी अचानक दगडफेक सुरू झाली. पवार यांच्या घरासमोरील गाड्या फोडण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
पोलिसांचा लाठीचार्ज, परिस्थिती नियंत्रणात
शहरात अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने आणि वाहनांच्या काचा फोडल्याच्या घटना घडल्याने तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर केंद्राबाहेरील गर्दी पांगवण्यात आली असून, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे.