For the first time, the election 'uninterrupted' | उपद्रवींवर प्रतिबंध केल्याने प्रथमच निवडणूक ‘निर्विघ्न’

उपद्रवींवर प्रतिबंध केल्याने प्रथमच निवडणूक ‘निर्विघ्न’

ठळक मुद्देबीड लोकसभा निवडणूक : २०१४ ला २८ गुन्हे, यावेळेस मात्र किरकोळ २ घटना

बीड : जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली. मागील महिनाभरपासून पोलिसांनी केलेले नियोजन आणि उपद्रवींवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांमुळे हे शक्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत २८ गुन्हे दाखल झाले होते. यावेळेस मात्र किरकोळ २ घटना घडल्या आहेत. यावरून निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत व शांततेत पार पडल्याचे स्पष्ट होते. जाणकारांच्या माहितीनुसार असे पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात येते.
बीड जिल्ह्यातील राजकारणाची राज्यभर चर्चा होते. यावेळीही ही चर्चा कायम होती. राजकीय चर्चा होत असली तरी प्रशासनाकडूनही ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतचे सर्व नियोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एक प्रकार वगळता ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान, निवडणूक काळात आचारसंहिता भंगाचे दोन आणि इतर तीन असे पाच गुन्हे दाखल झाले. मात्र, मतदानाच्या दिवशी गुन्हा घडू न देता दप्तर कोरे ठेवण्यात पोलिसांना यश आले. अंबाजोगाई ग्रामीण ठाणे हद्दीत मद्यपीने घातलेला गोंधळ आणि नेकनूर ठाणे हद्दीत झालेली शिवीगाळ हे अपवादात्मक किरकोळ प्रकार सोडले तर मतदान शांततेत झाले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्व ठाणेदारांची बैठक घेतली. सर्व उपद्रवी, गुन्हेगारांची यादी मागविली. त्यांच्या गुन्ह्यांनुसार त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया, एमपीडीए, हद्दपारीसारख्या कारवाया केल्या. यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यासह अपर अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणे प्रमुख यांनी तत्पर केलेला बंदोबस्त, यामुळेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांचे नियोजन : पहिली फेरी फत्ते; दुसरी फेरी २३ मे रोजी
बीड पोलिसांच्या माहितीनुसार ८ एप्रिलपर्यंत जुगार, दारूसह इतर गुन्हे करणाऱ्या ११ टोळ्यांमधील ५६ गुन्हेगारांवर मपोका ५५ व ५६ नुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध शस्त्र बाळगणाºया ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
३ अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केले आणि औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात त्यांची रवानगी केली.
दारूबंदी व जुगार अड्डयांवरही धाडी टाकल्या. यामध्ये दारूबंदीच्या ५५१ केसेस करून ४६ हजार ४०९ लिटर म्हणजेच १६ लाख ५६ हजार ५७० रूपयांची दारू जप्त केली आहे.
७० जुगार अड्डयांवर धाडी टाकून ११२६ आरोपी ताब्यात घेत त्यांना न्यायालसमोर हजर करण्यात आले आहे. ११२६ आरोपींना अजामीनपत्र वॉरन्टही बजावण्यात आले आहेत.
पाहिजे/फरारी असलेल्या १०४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ३२१७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
याबाबरोबरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाला सोबत घेऊन ६ ठिकाणी तर पोलिसांच्या विविध तुकड्या घेऊन ४ अशा जिल्ह्यात १० ठिकाणी पथसंचलन करण्यात आले आहे. तसेच दंगल नियंत्रणाची रंगीत तालीमही करण्यात आली.

Web Title: For the first time, the election 'uninterrupted'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.