ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर टाकून 2 लाखांची बॅग पळवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 15:08 IST2022-01-05T15:08:17+5:302022-01-05T15:08:30+5:30
बीड जिल्ह्यातील परळीत हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर टाकून 2 लाखांची बॅग पळवली
परळी:परळीतूनचोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका नामांकित बँकेच्या परिसरात सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खाज सुटणारी पावडर टाकून दोन लाखांची बॅग पळवल्याचा प्रकार सोमवारी घडला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
परळीतील सोमेश्वर सृष्टी येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त प्रभाकर बाळाजी शिंदे ( वय 66 ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्रभाकर शिंदे हे शहरातील एका नामांकित सहकारी बॅंकेच्या परिसरात 3 जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास गेले होते. त्यांच्याकडे एका लाल पिशवीत रोख रक्कम दोन लाख दहा हजार रुपये व पासबुक होते.
यावेळी अनोळखी तिघे त्यांच्या बाजूला आले आणि अचानक प्रभाकर शिंदे यांना अंगावर पावडर पडल्याचे लक्षात आले व लगेचच अंगाला खाज सुटली. अंग खाजवण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची लाल पिशवी तिथेच असणाऱ्या खुर्चीवर ठेवली. काही क्षणातच ही पिशवी गायब झाली. घडलेला प्रकार लक्षात येईपर्यंत तिघांनी पोबारा केला होता. दरम्यान, याप्रकरणी प्रभाकर बाळाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपींविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि सपकाळ हे करीत आहेत.