'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:52 IST2025-12-21T13:49:37+5:302025-12-21T13:52:17+5:30
Beed Nagar Parishad Election 2025 : 'परळीला बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला.'

'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
Beed Nagar Parishad Election 2025 : आज राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागत आहेत. या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महायुतीने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील परळीच्या बहुतांश प्रभागात महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा विजयदेखील निश्चित मानला जातोय. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर पलटवार केला.
मीडियाशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी सुरुवातीपासूनच सांगितलं होतं, पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी चांगल्या मताने निवडून येतील. आज परळीतील जनतेने पुन्हा एकदा महायुतीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला(अप) ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. महायुतीचे जवळजवळ सर्वच उमेदवार निवडून आले आहेत. जे अपक्ष निवडून आले, तेही महायुतीचेच आहेत. मी परळीकरांचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो.
गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
दरम्यान, निवडणुकीपूर्वी मुंडेंवर विरोधकांकडून, विशेषतः बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून सातत्याने टीका होत होती. या बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, माझ्यावर टीका करणाऱ्यांना निकालानंतर योग्य उत्तर देईन, असो बोललो होतो. परळीच्या जनतेनेच टीकाकारांना योग्य चपराक बसवली आहे. खासदार परळीत टळ ठोकून होते, तरी काही फरक पडला नाही. आता तरी विरोधकांनी आपली जागा काय आहे, आपली लायकी काय आहे, हे ओळखावी.
एखाद्याला बदनाम करण्यासाठी, गावाला बदनाम करण्यासाठी तुम्ही जो डाव टाकला होता, तो डाव परळीच्या जनतेने, बीड जिल्ह्यातील जनतेने हा डाव उधळून टाकला आहे. परळी असो, बीड असो, गेवराई असो, अंबाजोगाई असो, या नगरपालिका महायुतीने मिळवल्या आहेत. जिथे जिथे भाजप आणि आमची युती झाली नाही, तिथे भाजपने विजय मिळवला आहे, त्यांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.