Municipal Election: बीडमध्ये क्षीरसागर घराण्यात संघर्ष, तर परळीत मुंडे भाऊ-बहीण एकत्र!
By सोमनाथ खताळ | Updated: November 25, 2025 16:15 IST2025-11-25T16:13:04+5:302025-11-25T16:15:02+5:30
सहा पालिकांत नगराध्यक्षपदासाठी ५० उमेदवार रिंगणात; सर्वाधिक बीडमध्ये

Municipal Election: बीडमध्ये क्षीरसागर घराण्यात संघर्ष, तर परळीत मुंडे भाऊ-बहीण एकत्र!
बीड : बीडसह अंबाजोगाई, परळी, धारूर, माजलगाव आणि गेवराई या सहा शहरांतील पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी तब्बल ५० उमेदवार मैदानात असून, सर्वाधिक १९ उमेदवार एकट्या बीडमध्ये आहेत. बीडमध्ये दोन क्षीरसागर कुटुंबात थेट फाईट असून, गेवराईत भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादीमध्ये सामना रंगला आहे. परळीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे महायुतीसाठी एकत्रित आले आहेत. आष्टी वगळता पाचही मतदारसंघांतील आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बीडमध्ये दोन क्षीरसागरांमध्ये ‘फाईट’
बीड पालिकेत मागील वेळी राष्ट्रवादीचे डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष होते आणि त्यांचेच पालिकेवर वर्चस्व होते. यावेळी आजारपणामुळे त्यांचा मुलगा डॉ. योगेश क्षीरसागर व सून डॉ. सारिका क्षीरसागर यांनी भाजपकडून मैदानात उडी घेतली आहे. त्यांच्या डॉ. ज्योती घुंबरे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तर आघाडीकडून (काँग्रेस वगळून) आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली स्मिता वाघमारे मैदानात आहेत. या दोन क्षीरसागरांमध्ये तर फाईट होणारच आहे, परंतु त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचेही आव्हान असेल. प्रेमलता पारवे या उमेदवार असून आ. विजयसिंह पंडित हे नेतृत्व करत आहेत. काँग्रेसने 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली असून, एमआयएमही मतांची बेरीज बिघडू शकते.
अंबाजोगाईत ‘मोदी पॅटर्न’
अंबाजोगाईत मागील दोन टर्म राजकिशोर मोदी यांच्या भावजयी रचना सुरेश मोदी या नगराध्यक्ष होत्या. आता आरक्षण खुले झाल्याने खुद्द राजकिशोर मोदी (सध्या अजित पवार गटात) हे मैदानात उतरले आहेत. त्यांना भाजपच्या आ. नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचे आव्हान आहे. आतापर्यंत तरी मोदी पॅटर्न पालिकेवर प्रभावी राहिला आहे. मोदी आणि मुंदडा हे दोघेही पक्षांऐवजी आघाडी करून लढत आहेत.
परळीत मुंडे-बहीण भाऊ एकत्र
परळीत मागील वेळी राष्ट्रवादी आणि भाजप अशी थेट लढत झाली होती. यावेळी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आ. धनंजय मुंडे व शिंदेसेना एकत्रित आल्याने महायुतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून पद्मश्री धर्माधिकारी तर शरद पवार गटाकडून संध्या देशमुख मैदानात आहेत. दोघींचेही पती यापूर्वी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. मागील वेळी राष्ट्रवादीच्या सरोजिनी हालगे अध्यक्षा होत्या.
धारुरमध्ये उमेदवार बदलले
धारुरमध्ये भाजपने रामचंद्र निर्मळ यांना उमेदवारी दिली, तर पूर्वीचे भाजपचेच पण आता अजित पवार गटात असलेले बालासाहेब जाधव दुसरे उमेदवार आहेत. या दोघांनाही शरद पवार गटाचे अर्जुन गायकवाड यांचे आव्हान असेल. गायकवाड यांच्या पत्नीने यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
माजलगावात तिरंगी लढत
माजलगावात शरद पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या सून मेहेरीन चाऊस यांना मैदानात उतरवले आहे. त्यांना भाजपच्या डॉ. संध्या मेंडके, अजित पवार गटाच्या नेरोनिसा पटेल यांचे आव्हान असणार आहे. येथे तिरंगी लढत होत असून, आ. प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, बाबुराव पोटभरे अशा नेत्यांची येथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
गेवराईत भाजप-राष्ट्रवादीत फाईट
गेवराईत आ. लक्ष्मण पवार यांनी आतापर्यंत पालिकेवर वर्चस्व गाजवले आहे. यावेळी त्यांच्या भावजयी गीता पवार मैदानात असून, त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शीतल दाभाडे यांचे आव्हान असेल. माजी आ. अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित हे राष्ट्रवादीचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतच थेट लढत होत आहे.
नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार
पालिका - उमेदवार
अंबाजोगाई : ८
बीड : १९
धारुर : ५
गेवराई : ६
माजलगाव : ४
परळी : ८
एकूण - ५०