बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले

By सोमनाथ खताळ | Published: April 29, 2024 02:57 PM2024-04-29T14:57:27+5:302024-04-29T15:02:57+5:30

जनतेशी संपर्कही होतोय कमी :

Beed has no Congress MP and MLA after 1990; All the leaders went to BJP, NCP | बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले

बीडमध्ये १९९० नंतर काँग्रेसचा खासदार अन् आमदार नाही; सर्व नेते भाजप, राष्ट्रवादीत गेले

बीड : जिल्ह्यात १९९० मध्ये चार आमदार आणि १९९१ मध्ये लोकसभा निवडणुकीत केशरकाकू क्षीरसागर यांच्या रूपाने काँग्रेसने शेवटचा गुलाल उधळला. त्यानंतर सर्व बडे नेते भाजप आणि राष्ट्रवादीत गेले. त्यामुळेच जिल्ह्यात सध्या हे दोन पक्ष मजबूत आहेत. १९५२ पासून २०१९ पर्यंत एका पोटनिवडणुकीसह १८ निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये सहा वेळा काँग्रेसचे खासदार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे तीन वेळा केशरकाकू क्षीरसागर यांनीच गुलाल उधळला आहे. त्यानंतर मात्र कोणालाही विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही. 

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीपासून एकवेळा राष्ट्रवादी सोडली तर बाकी सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत. सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात मजबूत आहेत; तसेच खा. रजनीताई पाटील आणि माजी मंत्री अशोक पाटील यांच्याशिवाय दुसरे मोठे नेतेही नाहीत. त्यांचा केज वगळता इतर मतदारसंघात फारसा संपर्क नसल्याने कार्यकर्त्यांचे जाळे दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे दिसत आहे.

पाटील घराण्याशिवाय मोठा नेता नाहीच
रजनी पाटील १९९६ मध्ये केज तालुक्यातील जवळबन जिल्हा परिषद गटाच्या सदस्या होत्या. गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री असताना त्यांना भाजपमध्ये घेत लोकसभेची उमेदवारी दिली. त्यांनीही यात विजय मिळवला; परंतु लगेच १९९८ मध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना दोन वेळा राज्यसभा सदस्य केले; परंतु अद्याप तरी याचा फायदा जिल्ह्याला फारसा झालेला नाही. मोेठे प्रकल्प, उद्योगांची आजही प्रतीक्षा आहे. माजी मंत्री अशोक पाटील आणि खा. रजनी पाटील या घराशिवाय जिल्ह्यात काँग्रेसचा मोठा नेताही कोणी नाही.

१९९० मध्ये हे होते आमदार 
१९९० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दबदबा होता. गेवराईतील शिवाजीराव पंडित, आष्टीतून भीमराव धोंडे, चौसाळ्यातून जयदत्त क्षीरसागर आणि माजलगावातून राधाकृष्ण होके पाटील आमदार होते. १९९९ ला राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर केशरकाकू क्षीरसागर यांच्यासह पंडित व इतर बडे नेते राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर राष्ट्रवादी मजबूत झाली आणि काँग्रेस डबघाईला आली.

काँग्रेसमध्ये काय कमी? 
काँग्रेसला जिल्ह्यात नेतृत्वाचा अभाव आहे. पाटील घराण्याचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी फारसा संपर्क नाही; तसेच नवे पदाधिकारी, कार्यकर्ते तयार करण्यासाठी काही उपाययोजना होत नसल्याचे दिसते.

जिल्ह्यात एकाही संस्थेवर वर्चस्व नाही
आतापर्यंत राजकिशोर मोदी या एकमेव नेत्यामुळे अंबाजोगाई नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु मोदी यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे; तसेच खा. पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या केज नगरपंचायतीवरही वर्चस्व राखता आले नाही. राज्यसभा सदस्य वगळता इतर कोणत्याही ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व नसल्याचे दिसते.

जिल्ह्यातील काँग्रेसचे खासदार: 
खासदार - पक्ष - वर्षे

रखमाजी धोंडिबा - भा.रा.काँ. - १९५७ 
द्वारकादास मंत्री - भा.रा.काँ. - १९६२ 
पंडित सयाजीराव त्रिंबकराव - भा.रा.काँ. - १९७१ 
केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९८० 
केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९८४ 
केशरकाकू क्षीरसागर - काँग्रेस आय - १९९१

Web Title: Beed has no Congress MP and MLA after 1990; All the leaders went to BJP, NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.